राजकारणावर मी नंतर बोलेन; सध्या विकास कामावर बोलणार – आदित्य ठाकरे

73

मुंबई,दि.१४(पीसीबी) – पर्यावरण मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई औरंगाबाद येथे दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्टय़ातील ‘ऑरिक सिटी हॉल’ची पाहणी गुरुवारी केली. या बठकीनंतर पत्रकारांनी त्यांना संभाजीनगरच्या मुद्दय़ावरुन छेडले असता ‘राजकारणावर मी नंतर बोलेन. सध्या काम करण्याकडे कल आहे’, असे सांगत प्रश्न टोलवला.

‘ऑरिक सिटीत अनेक उद्योग येऊ पाहात आहेत. हे काम अजून पुढे वाढतच जाईल. स्थानिकांना रोजगार मिळेल. राज्याच्या महसूलात वाढ होईल. सायकल ट्रॅक पाहून आनंद झाला. पोलिस हौसिंग, सार्वजनिक स्वच्छतागृहावर भर देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या असून त्यांच्या प्रकल्प नियोजनात या बाबी आहेत.’ असंही आदित्य ठाकरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले आहेत.

दरम्यान, मनसेकडून हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्यानंतर औरंगाबाद येथील महापालिका निवडणुकीमध्ये औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हावे ही मागणी उचलून धरली जाईल, असे अलीकडेच मनसेमध्ये पुन्हा प्रवेश घेतलेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले होते.