राखी आणि गणेश मूर्तीवर जीएसटी नाही; केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा

29

नवी दिल्ली, दि.१२ (पीसीबी) – रक्षाबंधन आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशातील जनतेला आनंदाची बातमी दिली आहे. राखी आणि गणेश मूर्तींना जीएसटीतून वगळण्यात आल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी आज (रविवार) येथे केली आहे.

रक्षाबंधन आणि गणेशोत्सव सण भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे राखी, गणेश मूर्ती, हस्तशिल्प, हातमागाच्या वस्तू आदींना जीएसटीमधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पीयूष गोयल यांनी सांगितले. गणेशोत्सव आणि रक्षाबंधनच्या काळात लोक मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. त्यामुळे या दोन्ही सणांशी संबंधित वस्तुंना जीएसटीतून वगळण्यात आले आहे. यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या २६ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. तर १३ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे.

या पूर्वी सरकारने सॅनिटरी नॅपकिनलाही जीएसटीतून वगळण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला होता. आधी या उत्पादनावर १२ टक्के जीएसटी आकारला जात होता. त्याशिवाय स्त्रीयांचे दागिने, हेअर ड्रायर, परफ्यूम आणि हँड बॅगवरील जीएसटीही २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे.