रहाटणीत व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या; मारेकरी सीसीटीव्हीत कैद

538

चिंचवड, दि. २४ (पीसीबी) – दुचाकीवरील दोघा हल्लेखोरांनी रहाटणीतील एका व्यावसायीकाची गोळ्या घालून हत्या केली. ही घटना सोमवार (दि. २३) रात्री साडेअकराच्या सुमारास रहाटणी येथील प्रभात कॉलनीच्या मुख्य रस्त्यावर घडली.

अनिल रघुनाथ धोत्रे (वय ४४, रा. प्रभात कॉलनी, राहटणी) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे मोठे बंदू राजकुमार रघुनाथ धोत्रे (वय ५०, रा. रहाटणी, लिंक रोड) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल धोत्रे यांचे काळेवाडीतील पाचपीर चौकात ज्योती टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाचे दुकान आहे. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे ते दुकान बंद करून घरी निघाले असता दुचाकीवरुन आलेल्या दोघा हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. तसेच त्यांच्या जवळील काळ्यारंगाची पैशांची पिशवी चोरुन नेली. काही स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने थेरगाव येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, अनिल धोत्रे हे त्यांच्या ज्योती ट्रर्स अँड ट्रॅव्हल्स नावाच्या दुकानातून मोठ्या प्रमाणात मनी ट्रान्सफर करत असल्याने त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात रोकड जमा होत होती. यामुळे कोणीतरी पाळत ठेवून चोरीच्या उद्देशाने त्यांचा खून केला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांना घटना स्थाळावरील काही सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले आहेत. त्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे.