रहाटणीत पैशांच्या व्यवहारातून व्यावसायिकाला पोत्यात घालून जबर मारहाण

148

रहाटणी, दि. २६ (पीसीबी) – पैशांच्या व्यवहारावरून नऊ जणांच्या टोळक्याने एका व्यावसायिकाला कोयत्याचा धाक दाखवत पोत्यात कोंबले आणि काठीने, लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि.२४) सायंकाळी सव्वासात ते रात्री पावणेबाराच्या दरम्यान रहाटणी येथे घडली.

संकेत किशोर राका (वय २८, रा.अलंकापुरम सोसायटी, चऱ्होली) असे मारहाण झालेल्या व्यावसयिकाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी सुमित दायनंद सोमवंशी, पवन सुदाम मंडलिक, आणखी एक अशा तिघांना अटक केली आहे. तर रामदास गोडांबे, शुभमं कवठे, धनंजय कोकणे, कुणाल थोपटे, राजू दशरथ बहिरे आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राका यांचा इव्हेंन्ट मॅनेजमेंन्टचा व्यवसाय आहे. आरोपींकडून त्यांनी पैसे घेतले होते. त्यातील पाच लाख रूपये राका यांच्याकडे बाकी होते. आरोपींनी सोमवारी सायंकाळी राका यांना रहाटणीतील रामदास गोडांबे याच्या गॅरेजमध्ये बोलावून घेतले. राका यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यांना कोयत्याचा धाक दाखवून पोत्यात घातले. शिवीगाळ करत काठीने, लाथाबुक्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्या तावडीतून सुटलेल्या राका यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. वाकड पोलिस तपास करत आहेत.