रहाटणीतील ‘पुणेकर ज्वेलर्स’ या सराफी दुकानाच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार करुन दरोडा टाकणाऱ्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

245

चिंचवड, दि. १८ (पीसीबी) – रहाटणी येथील ‘पुणेकर ज्वेलर्स’ या दुकानावर बुधवार (दि.६ मार्च) दुपारी एकच्या सुमारास दोन दुचाकीवरुन आलेल्या पाच दरोडेखोरांनी व्यावसायिकावर गोळीबार करुन दुकानातील सोने-चांदिचे दागिने आणि रोख रक्कम लुटून नेली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यात वाकड पोलिसांना यश आले असून त्यांनी दोन आरोपींना दोन गावठी पिस्तुल आणि सोन्याचे दागिने असा एकूण २३ लाखांच्या ऐवजासह अटक केली आहे.

सुभाष मोहनलाल बिशनोई (वय २४, रा. मंगाली मोहबत, ता. व जि. हिसार, रा. हरियाणा) आणि महिपाल दुधाराम जाट (वय २१, रा. बालेवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्याच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्यांक मेहता यांचे रहाटणी कोकणे चौकातील आकाश गंगा सोसायटीमध्ये ‘पुणेकर ज्वेलर्स’ नावाचे दुकान आहे. बुधवारी (दि.६ मार्च) दुपारी पावणेएकच्या सुमारास त्यांच्या दुकानात पाच दरोडेखोर शिरले. त्यापैकी एकाने दिव्यांक यांच्या मांडीत गोळी मारुन त्यांना जखमी करत कर्मचारी मोनिका कंधारे (वय ३८) हिला धमकावून दुकानातील ९० लाख १५ हजार किमतीचे सोने व डीव्हीआर चोरून नेला. घटनेबाबत माहिती मिळातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसारातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाला सुरुवात केली. तसेच मोठ्या शिताफीन आरोपी सुभाष आणि महिपाल या दोघांना अटक केली. त्यांचे इतर साथीदार अद्याप फरार आहेत. वाकड पोलीस त्यांच्या शोध घेत आहेत.

ही कारवाई वाकड पोलीस ठाण्याच्या गुन्हे विभागाचे निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, फौजदार हरिष माने, सिद्धनाथ बाबर, कर्मचारी शाम बाबा, बापूसाहेब धुमाळ, बिभीषण कन्हेरकर, मनोज बनसोडे, नितीन ढोरजे, जावेद पठाण, विजय गंभीरे, दिपक भोसले, मधुकर चव्हाण, विक्रम कुदळ, नितीन गेंगजे, सुरेश भोसले, रमेश गायकवाड, भैरोबा यादव, दत्तात्रय इंगळे, डी. डी. सणस, विक्रम जगदाळे, विक्रांत चव्हाण, सुरज सुतार, मयुर जाधव, हनुमंत राजगे, सागर सुर्यवंशी, नुतन कोंडे, मयूर वाडकर यांच्या पथकाने केली.