रस्त्यावर वाढदिवस साजरा करणा-या टोळक्याकडून महिलेचा विनयभंग…

173

खेड, दि. १७ (पीसीबी) – रस्त्यावर वाढदिवस साजरा करत असलेल्या टोळक्याला रस्त्यातून सरकण्याबाबत सांगितल्याने टोळक्याने दांपत्यास मारहाण करत महिलेचा विनयभंग केला. ही घटना 13 जानेवारी रोजी दुपारी साडेपाच वाजता खेड तालुक्यातील काळे वस्ती बोरदरा येथे घडली.

परशुराम अण्णा पडवळ, दत्तात्रय काळुराम पडवळ, संतोष अण्णा पडवळ, सचिन विजय पडवळ (सर्व रा. बोरदरा, ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पीडित महिलेने रविवारी (दि. 16) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे पती दुचाकीवरून बोरदरा येथून रस्त्याने जात होते. काळे वस्ती येथे सचिन पडवळ याच्या वाढदिवसासाठी आरोपी रस्त्यावर जमले होते. तिथल्या लोकांना फिर्यादी यांच्या पतीने रस्त्यातून बाजूला होण्याबाबत सांगितले. त्यावरून आरोपींनी फिर्यादी यांच्या पतीची दुचाकी अडवून ‘तू लै शहाणा झाला आहेस का’ असे म्हणून मारहाण केली.

हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी मध्ये गेल्या असता आरोपींनी त्यांना अर्वाच्य भाषेत शिविगाळ करून त्यांच्याशी गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला. पोलीस उपनिरीक्षक दिनेश चव्हाण तपास करीत आहेत.