रस्त्यावर डिव्हायडर टाकण्यास विरोध केल्याने महिलेस मारहाण…

54

तळेगाव दाभाडे, दि. १(पीसीबी) – रस्त्याचे काम चालू असताना रस्त्यामध्ये डिव्हायडर टाकण्यास एका महिलेने विरोध केला. त्यावरून तिघांनी मिळून महिलेला मारहाण केली. तसेच महिलेचा विनयभंग केला. ही घटना गुरुवारी (दि. 28) सकाळी 11 वाजताच्या सुमारास मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे येथे घडली.

राहुल शेटे, काळू शेटे, प्रमोद शेटे (सर्व रा. नवलाख उंब्रे, ता. मावळ) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पीडित महिलेने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवलाख उंब्रे गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रस्त्याचे काम सुरू आहे. फिर्यादी महिलेच्या घरासमोर रस्त्याचे काम करत असताना आरोपी रस्त्यावर डिव्हायडर टाकत होते. त्यासाठी फिर्यादी यांनी विरोध केला. ‘आमच्या घरासमोर डिव्हायडर टाकू नका आम्हाला त्रास होतो’, असे फिर्यादीने म्हटले.

त्या कारणावरून आरोपींनी ‘आम्ही डिव्हायडर टाकणार तुम्हाला काय करायचे ते करा’, असे म्हणत फिर्यादी यांना विटाने आणि फावड्याने मारहाण केली. तसेच फिर्यादीशी गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.