रस्त्याने फोनवर बोलणे झाले धोक्याचे; मोबाइल हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ

1

भोसरी, दि. १० (पीसीबी) – पिंपरी परिसरातून दोन तर भोसरी एमआयडीसी परिसरातून एक मोबाईल फोन हिसकावून नेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत शनिवारी (दि. 9) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आकाश सोनावणे (वय 21, रा. नेहरूनगर, पिंपरी) आणि मोहम्मद रफिक मनसुबदार चौधरी (वय 59, रा. अण्णासाहेब मगर नगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोनवणे यांचा 12 हजार रुपयांचा मोबाईल फोन 17 डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता नेहरूनगर येथील स्टेडियम जवळून चालत जात असताना मोपेड दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी चोरून नेला. तर चौधरी यांचा 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन 17 डिसेंबर रोजी रात्री पावणे नऊ वाजता महापालिका आयुक्त बंगल्यासमोरून चोरून नेला. दोन्ही गुन्ह्यांचा तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

विजय ज्ञानेश्वर कांबळे (वय 39, रा. वैदूवादी, हडपसर) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कांबळे कार चालविण्याचे काम करतात. 17 नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता त्यांच्या प्रवासी ग्राहकाला सोडविण्यासाठी ते भोसरी एमआयडीसी परिसरात आले होते. त्यांनी ग्राहकाला सोडल्यानंतर त्यांना फोन आला. त्यामुळे ते फोनवर बोलण्यासाठी कारच्या बाहेर आले. त्यावेळी मोपेड दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांचा 15 हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare