रस्त्यात लावलेली दुचाकी बाजूला घे असं म्हटलं म्हणून त्याने…

57

वाकड, दि. 26 (पीसीबी) : रस्त्यात लावलेली दुचाकी वाहतुकीस अडथळा ठरत असल्याने दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले असता आठ जणांनी मिळून मारहाण करत दोघांवर कोयत्याने वार केले. ही घटना शुक्रवारी (दि. 24) रात्री लोकमान्य कॉलनी, गणेशनगर, थेरगाव येथे घडली.

अनिकेत अनिल शिंदे (वय 19, रा. भूमकर चौक, वाकड), प्रथमेश सूर्यवंशी अशी जखमींची नावे आहेत. अनिकेत यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार असद गोलंदाज (रा. लोकमान्य कॉलनी, गणेशनगर, थेरगाव), सुरज लोखंडे (रा. काळाखडक, वाकड), रोहन शेवंते (रा. ताथवडे) आणि त्यांचे चार ते पाच साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांचा मित्र प्रथमेश दुचाकीवरून लोकमान्य कॉलनी येथून जात होते. त्यावेळी आरोपींनी दुचाकी रस्त्यात लावली होती. त्यामुळे वाहतुकीस अडथळा येत होता. फिर्यादी अनिकेत यांनी आरोपींना दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले.

त्यावरून आरोपींनी अनिकेत यांना माघारी जाण्यास सांगत या रस्त्याने पुन्हा न येण्याची धमकी दिली. रोहन शेवंते याने कोयत्याने अनिकेत यांच्या डोक्यावर वार केला. तो अनिकेत यांनी हातावर झेलला. सुरज लोखंडे याने देखील कोयत्याने अनिकेत यांच्यावर वर केले. अनिकेत यांचा मित्र प्रथमेश भांडण सोडविण्यासाठी मध्ये आला असता आरोपी असद गोलंदाज याने कोयत्याने प्रथमेशवर वार केले. अन्य आरोपींनी अनिकेत आणि प्रथमेश यांना लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare