रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या नऊ वाहनांची तोडफोड

66

पिंपरी, दि.०७ (पीसीबी) : रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या वाहनांची तीन अनोळखी इसमांनी तोडफोड केली. ही घटना शनिवारी (दि. 6) रात्री 10 वाजताच्या सुमारास आहेर गार्डन मंगल कार्यालयाजवळ घडली. हनुमंत रोहिदास कसबे (वय 42, रा. लक्ष्मीनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन ते तीन अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वाहन चालक आहेत. त्यांनी त्यांची गाडी (एम एच 14 / एच क्यू 2439) वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डन मंगलकार्यालयाच्या बाहेर रस्त्याच्या बाजूला पार्क केली होती. तसेच परिसरात अन्य वाहने देखील पार्क केली होती.

शनिवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास दोन ते तीनजण वाहनांची तोडफोड करत असल्याचे फिर्यादी यांच्या निदर्शनास आले. आरोपींनी फिर्यादी यांच्या देखील वाहनाची दगड मारून तोडफोड केली होती. त्यामुळे फिर्यादी यांनी त्यांना जाब विचारला. त्यावरून आरोपींनी फिर्यादी यांना धक्काबुक्की करून त्यांच्या खिशातून 800 रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. परिसरातील नऊ वाहनांची आरोपींनी तोडफोड केली. चिंचवड पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.