रवी शास्त्री आणि निमरत कौर यांच्या अफेअर चर्चा

610

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – बॉलिवूड आणि क्रिकेट विश्व यांच्यातलं कनेक्शन साऱ्यांनाच ठावूक आहे. या दोन्ही क्षेत्रात वावरणाऱ्या व्यक्तींची नाती अगदी सहजतेने जुळल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसापूर्वीच क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी लग्नगाठ बांधली. या दोघांच्या चर्चा थांबत नाहीत तोच आता नव्या चर्चांना उधाण आले आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि अभिनेत्री निमरत कौर यांच्या अफेअर चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे.

‘स्पॉटबॉय’नुसार, २०१५ मध्ये एका कार लॉन्चिंगच्या निमित्ताने रवी शास्त्री आणि निमरत कौर यांची भेट झाली होती. तेव्हापासून म्हणजे दोन वर्षापासून ते एकमेकांना डेट करत असल्याचं समोर येत आहे. मात्र या वृत्ताला दोघांकडून कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही.

दरम्यान, रवी शास्त्री यांनी २०१२ मध्ये पत्नी रितू सिंह यांच्याशी कायदेशीररित्या घटस्फोट घेतला असून त्यांना अलका नावाची एक मुलगीदेखील आहे. विशेष म्हणजे यापूर्वी रवी शास्त्री यांचे नाव अभिनेत्री अमृता सिंगबरोबरदेखील जोडले गेले होते.

रवी शास्त्री यांचे रितू यांच्याबरोबर लग्न होण्यापूर्वी अमृता सिंग अनेक वेळा स्टेडिअमवर रवी शास्त्री यांना भेटण्यासाठी जात असे. तसेच ती शास्त्रींना चिअरदेखील करत असे. त्यामुळे त्यांच्या नात्याविषयी चर्चा सुरु झाली होती. मात्र कालांतराने ही चर्चा मागे पडत गेली आणि आता नव्याने रवी शास्त्रींचे नाव निमरत कौरबरोबर जोडले जात आहे. निमरत कौर एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. निमरतने आतापर्यंत ‘लंच बॉक्स’ आणि ‘एअरलिफ्ट’ यासारखे सुपरहिट चित्रपटामध्ये भूमिका केली आहे.