रणांगण लोकसभेचे; शिरूर मतदारसंघात तिरंगी लढत, राष्ट्रवादीच्या नेत्यांची भूमिका निर्णायक ठरणार

6628

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडमधील भोसरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात चौथ्यांदा विजय मिळवण्यासाठी शिवसेनेला चांगलाच संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर मतदारसंघात आजमितीला शिवसेनेची राजकीय स्थिती भक्कम असल्याचे चित्र आहे. या मतदारसंघात विरोधकांमधील बेकीचा फायदा शिवसेनेला होत आला आहे. त्यामुळे विरोधकांमध्ये विशेषतः राष्ट्रवादीत एकी निर्माण झाली, तर शिवसेनेसाठी आगामी निवडणूक अवघड होईल. दुसरीकडे युती न झाल्यास भाजपही निवडणुकीच्या रिंगणात असेल. त्यामुळे राष्ट्रवादीतील एकी, भाजपची रणनिती यावरच शिवसेनेचा विजय की पराभव हे निश्चित होणार आहे. आगामी निवडणुकीत शिरूरमध्ये भाजप विरूद्ध शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत होऊन कोणालाही विजयाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघ शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागात विभागला गेला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील दोन विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात येतात. त्यामध्ये हडपसर आणि भोसरी विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. याशिवाय ग्रामीण भागातील जुन्नर, शिरूर, आंबेगाव आणि खेड-आळंदी हे चार विधानसभा मतदारसंघांचाही या लोकसभा मतदारसंघात समावेश आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहिल्यास शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे तीन (शिरूर, भोसरी आणि हडपसर), तर मनसे (जुन्नर), राष्ट्रवादी (आंबेगाव) आणि शिवसेनेचा (खेड-आळंदी) प्रत्येकी एक आमदार आहे. या लोकसभा मतदारसंघात पूर्वीपासून राष्ट्रवादीचे प्राबल्य राहिले आहे. परंतु, राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजी आणि भाजपची साथ नेहमी शिवसेनेच्या पथ्यावर पडली आहे. राष्ट्रवादीतून रसद मिळत असल्यामुळे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे सलग तीनवेळा निवडून आले आहेत.

या मतदारसंघातील आताची राजकीय परिस्थिती थोडी कठिण बनली आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीची प्रथक क्रमांकाची ताकद आहे. त्याखालोखाल भाजप आणि शिवसेनेची तिसऱ्या क्रमांकाची ताकद आहे. तरीही या मतदारसंघात शिवसेनेचा विजय होण्याचा राजकीय अंदाज बांधला जातो. आगामी निवडणुकीत भाजप-शिवसेना युती न झाल्यास शिवसेनेच्या विजयाचा मार्ग थेडा खडतर बनल्यास आश्चर्य वाटायला नको. खासदार आढळराव पाटील यांनी सलग १५ वर्षे खासदार असूनही विरोधकांना दुखावण्याचे काम कधी केले नाही. परंतु, भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि खासदार आढळराव पाटील यांच्यातील टोकाचा राजकीय संघर्ष लपून राहिलेले नाही. हे दोघेही एकमेकाला पाण्यात पाहतात, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे या दोघांमधील हा राजकीय संघर्ष शिरूर लोकसभा मतदारसंघातील राजकारणाला कलाटणी देणारी ठरू शकते. युती न झाल्यास शिरूर मतदारसंघाच्या मैदानात आढळराव पाटील यांच्यासमोर महेश लांडगे हेच शड्डू ठोकतील, असा राजकीय कयास बांधला जात आहे.

दुसरीकडे या मतदारसंघात राष्ट्रवादीची रणनिती सुद्धा महत्त्वाची ठरणार आहे. आपल्यापेक्षा कोणी मोठा होता कामा नये, या राजकीय हेतूने या मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आतून कायम शिवसेनेला मदत केली आहे. खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दम भरूनही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कधीच आपल्या पक्षाचे काम केले नाही. राष्ट्रवादीतील जिरवाजिरवीचे राजकारण थांबले, तर आगामी निवडणुकीत शिवसेनेसोबत भाजपलाही घरी बसावे लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही. परंतु, हे सर्व राष्ट्रवादीच्या एकीवर अवलंबून आहे. राष्ट्रवादीकडून प्रदीप कंद, मंगलदास बांदल आणि दिलीप वळसे-पाटील या तिघांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादीकडून स्वतः वळसे-पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले, तर शिवसेनेच्या आढळराव पाटील यांची दमछाक होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला उमेदवारी देते यावरच शिरूर मतदारसंघाचे राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.

भाजपलाही या मतदारसंघात विजय मिळवण्याची संधी आहे. भोसरी आणि हडपसर या दोन शहरी भागातील विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपच्या मतदारांची संख्या मोठी आहे. तसेच ग्रामीण भागातही भाजपला मानणारा मतदार तयार झाला आहे. राष्ट्रवादीतील बेकी कायम राहिल्यास त्याचाही भाजपला फायदा होऊ शकतो. राष्ट्रवादीतील बेकीमुळे शिवसेनेकडे वळणारा मतदार भाजपकडे वळल्यास या मतदारसंघात भाजपला प्रथमच कमळ फुलवण्याची संधी मिळू शकते. हे सर्व भाजपचा उमेदवार कोण यावर अवलंबून असणार आहे. शिरूर मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील मतदारांमध्ये भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आपली एक वेगळी छाप निर्माण केली आहे. त्यामुळे लांडगे हे पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आणि राष्ट्रवादीचीही रसद मिळाली, तर भाजपचा विजयाच्या मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे. लांडगे यांच्या व्यतिरिक्त हडपसरचे आमदार योगेश टिळेकर यांचेही नाव भाजपकडून चर्चेत आहे. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजप विरूद्ध शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार असून, राष्ट्रवादीच्या भूमिकेवर विजयाचे गणित ठरणार आहे.