रजनीकांतची पत्नी राज ठाकरेंच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण

57

मुंबई, दि. २ (पीसीबी) –  सुप्रसिद्ध तामिळ अभिनेते रजनीकांत यांच्या पत्नी लता रजनीकांत यांनी आज (सोमवार)  महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे अध्‍यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.  ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी झालेल्या भेटीवेळी राज ठाकरेंच्‍या पत्‍नी शर्मिला ठाकरेदेखील उपस्थित होत्‍या. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

ही एक सदिच्‍छा भेट होती, असे राज ठाकरेंनी सांगितले. मात्र, रजनीकांत यांनी नुकत्‍याच एका राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत आपला पक्ष सर्व २३४ जागा लढवणार असल्याचे रजनीकांत यांनी म्‍हटले आहे. या पार्श्‍वभूमीवर या भेटीकडे पाहिले जात आहे.

दरम्यान, फेसबुकपेजवर राज ठाकरेंनी ही केवळ औपचारीक भेट असल्‍याचे म्‍हटले आहे. या भेटीदरम्‍यान उभयतांत राजकारण, समाजकारण, सिनेमा अशा अनेक विषयांवर चर्चा झाली, असे राज ठाकरेंनी म्‍हटले आहे.