रक्षाबंधनासाठी सहकुटूंब सासरी गेले असताना चोरट्यांनी साधला डाव; पिंपळे गुरव येथे घरफोडी करुन पळवले दीड लाखांचे दागिने

248

चिंचवड, दि. २७ (पीसीबी) – रक्षाबंधनासाठी सहकुटूंब सासरी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे सेफ्टी दरवाज्याचा कडीकोयंडा आणि लाकडी दरवाज्याचे लॅच लॉक तोडून घरातील तब्बल १ लाख ४२ हजार ४०० रुपये किमतीचे ६८.५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि २७० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने चोरुन नेले. ही घटना शनिवारी (दि.२५) रात्री दहा ते रविवारी सकाळी आठच्या दरम्यान पिंपळे गुरवमधील श्रीनगर गल्ली क्र.१ येथे असलेल्या टेन इलाइट सोसायटीच्या समोरील प्लॉट क्र.६/ए येथे घडली.

याप्रकरणी प्रेमनाथ विठ्ठल राठोड (वय ४०, रा. प्लॉट नं.६/ए, श्रीनगर गल्ली क्रं.१, टेन इलाइट सोसायटी समोर, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री दहा ते रविवारी सकाळी आठच्या दरम्यान प्रेमनाथ राठोड हे त्यांच्या कुटूंबीयांना घेऊन पिंपळे सौदागर येथील त्यांच्या सासरच्या मंडळींकडे रक्षाबंधनासाठी गेले होते. या दरम्यान त्यांचे पिंपळे गुरव येथील घराला लॉक असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या सेफ्टी दरवाज्याचा कडीकोयंडा आणि लाकडी दरवाज्याचे लॅच लॉक तोडून घरातील तब्बल १ लाख ४२ हजार ४०० रुपये किमतीचे ६८.५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि २७० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने चोरुन नेले. सांगवी पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.