रक्षाबंधनासाठी माहेरी जाऊ न दिल्याने  विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

571

दिल्ली, दि. २८ (पीसीबी) – रक्षाबंधनासाठी माहेरी जाऊ न दिल्याने नोएडातील चरणदास गावात एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेच्या कुटुंबीयांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली.

रिना (वय २७)  असे आत्महत्या केलेल्या विवाहीत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी नोएडा पोलिसांनी पती लोकेश याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१३ मध्ये अलीगढच्या रिनाचे लग्न बुलंदशहरमधील लोकेश याच्याशी झाले होते. लोकेशला नोएडातील कंपनीत नोकरी लागल्याने दोघेही चरणदास गावात राहू लागले. या दाम्पत्याला तीन वर्षांची मुलगी देखील आहे.   रविवारी (दि.२६) सकाळी रिनाने लोकेशला रक्षाबंधननिमित्त अलीगढला भावाच्या घरी जाऊया, असे सांगितले. मात्र, लोकेशने तिला नकार दिला. संध्याकाळी यावरुन दोघांमध्येही भांडण झाले. काही वेळाने लोकेश तिच्या मुलीला घेऊन फिरायला बाहेर निघून गेला. रात्री नऊ वाजता तो घरी परतला असता रिनाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. रिनाच्या कुटुंबीयांनी लोकेशविरोधात मानसिक व शारीरिक छळ तसेच आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत लोकेशला अटक केली आहे.