“योजना बंद, वसुली सुरु. चालू लोकांचं चालू सरकार. शेतकऱ्यांना फुटकी कवडी नाही आणि नेत्यांच्या….”

62

नांदेड, दि.२५ (पीसीबी) : देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजप उमेदवार सुभाष साबणे यांच्या प्रचारासाठी सभांचा धडाका लावला. बिलोलीमधील सभेतून देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ‘योजना बंद आणि वसुली सुरु, हे चालू लोकांचं चालू सरकार आहे. शेतकऱ्यांना फुटकी कवडी नाही आणि नेत्यांच्या घरात पॅकेज जात आहेत’, असा घणाघात फडणवीस यांनी केलाय.

राज्याच्या तिजोरीत पैसा आहे, पण महाविकास आघाडी सरकारमध्ये नियत नाही. कोरोनाच्या कालखंडात एकाही घटकाला त्यांनी मदत केली नाही. लोक जगत आहेत की मरत आहेत यांची पर्वा त्यांनी केली नाही. हे महाविकास आघाडी सरकार जनविरोधी आहे. यांनी मराठा, ओबीसी सगळ्यांचं आरक्षण घालवलं. मराठवाडा वैधानिक विकास मंडळ बंद केलं. पण, मराठवाड्यातील एकही मंत्री बोलला नाही. हा साझा विषय नाही. पुढच्या अनेक पिढ्यांच्या तोंडचा विकास पळवून नेण्याचा हा प्रकार आहे, अशा शब्दात फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागलं.

तत्पूर्वी नांदेडच्या कुंडलवाडी इथं बोलताना फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारनं बंद केलेल्या योजनांचा पाढाच वाचला. राज्यातील सरकारची 2 वर्षातील उपलब्धी काय? जलयुक्त शिवार बंद, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना बंद, नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना बंद, स्मार्ट योजना बंद, ड्रीप इरिगेशन बंद, रस्त्यांची कामे बंद, धरणांची कामे बंद, शेतकऱ्यांचा विमा, वीज बंद, शेतकऱ्यांना मदत बंद, राज्यात केवळ बंद सरकार उरलं असल्याचा घणाघात फडणवीस यांनी केला.

WhatsAppShare