येरवड्यात पोलिस चौकी पासून हाकेच्या अंतरावर तलवारीने वार करुन तरुणाची हत्या; एक गंभीर जखमी

664

पुणे, दि. २३ (पीसीबी) – दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात हल्लोखोरांनी दोघा मित्रांवर धारदार शस्त्राने हल्ला करुन त्यांना गंभीर जखमी केले. यामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर गंभीर जखमी आहे. ही थरारक घटना बुधवारी (दि.२२) रात्री साडेअकराच्या सुमारास येरवडा परिसरातील पर्णकुटी पोलीसचौकी जवळ घडली.

निहाल जनार्दन लोंढे (वय १९, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर राहुल सतीश कांबळे (वय २३, रा. लक्ष्मीनगर, येरवडा ) हा गंभीर जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री अकराच्या सुमारास नेहाल आणि राहुल येरवाडा येथील पर्णकुटी परिसरात उभे असताना त्या ठिकाणी दुचाकीवरून काही जण आले. त्यांनी धारदार हत्यारांसह दोघांवर हल्ला केला. या प्राणघातक हल्ल्यात नेहाल लोंढे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र राहुल कांबळे हा गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पूर्णकुटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांनाही रुग्णालयात दाखल केले मात्र नेहालचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर राहुल हा गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालायात उपचार सुरु आहेत. या थरारक घटनेमुळे येरवडा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पर्णकुटी पोलिस तपास करत आहेत.

दरम्यान हाकेच्या अंतरावर असलेल्या पर्णकुटी पोलिस चौकीजवळ हा प्रकार झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.