येरवडा कारागृहा बाहेरच उपनिरीक्षकावर गोळीबार

178

पुणे, दि. ६ (पीसीबी) – पुण्यातील येरवडा कारागृहातील रात्री पाळी झाल्यावर घरी जाण्यासाठी निघालेल्या उपनिरीक्षकावर गोळीबार केल्याची घटना घडली. ही घटना आज (शुक्रवारी) सकाळी आठच्या सुमारास घडली. या गोळीबारात उपनिरीक्षक मोहन पाटील बचावले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपनिरीक्षक मोहन पाटील हे येरवडा कारागृहात तैनात आहेत. आज (शुक्रवारी) सकाळी आठच्या सुमारास रात्र पाळी संपवून मोहन पाटील घरी जाण्यासाठी निघाले. यादरम्यान कारागृहाबाहेर दोन अज्ञात व्यक्तींनी मोहन पाटील यांच्यावर गोळीबार केला. हल्लेखोरांनी दोन गोळ्या झाडल्या. सुदैवाने हल्लेखोरांचा नेम चुकल्याने पाटील यातून बचावले आहेत.

दरम्यान, गोळीबाराच्या घटनेने येरवडा कारागृह परिसरात खळबळ उडाली आहे. तुरुंगाच्या सुरक्षेचा प्रश्नही चर्चेत आला आहे. मात्र, त्यांच्यावर गोळीबार कोणी केला, याचा तपास अद्याप लागलेला नाही. पोलिस तपास करत आहेत.