येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी; एकाच्या डोक्यात दगड घालून केले गंभीर जखमी

262

पुणे, दि. १० (पीसीबी) –  येरवडा कारागृहात चार कैद्यांमध्ये झालेल्या भांडणात एकाच्या डोक्यात तिघांनी दगड घालून त्याला गंभीर जखमी केले आहे. त्याच्यावर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना शनिवारी (दि.७) रात्री आठच्या सुमारास घडली होती, मात्र याप्रकरणी सोमवारी (दि.९) येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

विकास मलगुंडे असे डोक्यात दगड लागून गंभीर जखमी झालेल्या कैद्याचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी शुभम राजापूर, सतपाल रुपनवर आणि वेदांत माने या कैद्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा कारागृहातील बरॅक क्रमांक एकमध्ये शुभम राजापूर, सतपाल रुपनवर, विलास मलगुंडे आणि वेदांत माने या चौघा कैद्यांसह इतरही कैदी उपस्थित होते. शनिवारी रात्री आठच्या सुमारास चौघांमध्ये अचानक भांडण झाले. यावेळी विकास मलगुंडे याला तिघांनी बेदम मारहाण करीत बरॅकमधीलच एक दगड विकासच्या डोक्यात घातला. यामुळे विकासच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. विकासला तत्काळ ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती सध्या गंभीर आहे.

दरम्यान या चौघांमध्ये नेमक्या कोणत्या कारणावरून वाद झाला होता हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, अशा प्रकारच्या जीवघेण्या हल्ल्यामुळे कारागृहात एकच खळबळ उडाली आहे.