“येत्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसला 300 जागा मिळणार नाहीत” : गुलाम नबी आझाद यांचं मोठं वक्तव्य

104

नवी दिल्ली, दि.२ (पीसीबी) : येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसने जोरदार प्रयत्न सुरू केलेला असतानाच काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी मोठं विधान केलं आहे. येत्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसला 300 जागा मिळणार नाहीत, असं गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे. जम्मू-काश्मीरच्या पुंछ येथील एका रॅलीला संबोधित करताना त्यांनी हे विधान केलं. यावेळी त्यांनी 370 कलमावर मौन पाळण्याच्या आपल्या भूमिकेचंही समर्थन केलं. केवळ सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण आहे. त्यामुळे संसदच याबाबत निर्णय घेऊ शकते. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने अनुच्छेद 370 रद्द केला आहे. त्यामुळे ते हा कायदा पुन्हा लागू करणार नाहीत. मी हा कायदा पुन्हा लागू करेन असं मी तुम्हाला सांगू शकत नाही. कारण ते खोटं बोलणं होईल, असं आझाद म्हणाले.

केवळ लोकांना खूश करण्यासाठी मी 370 कलमाबाबत बोलणार नाही. जे आमच्या हातात नाही, त्याबाबतची खोटी आश्वासने मी तुम्हाला देणार नाही. त्यामुळे या कलमाबाबत बोलणं योग्य नाही. लोकसभेत ज्यांचं बहुमत असेल असं सरकारच 370 कलम हटवू शकते. आणि त्यासाठी 300 खासदार हवे आहेत. 2024च्या लोकसभा निवडणुकीत आमचे 300 खासदार निवडून येतील हे आश्वासनही मी तुम्हाला देऊ शकत नाही. मी तुम्हाला कोणतंही चुकीचं आणि खोटं आश्वासन देणार नाही. त्यामुळेच 370 कलम हटविण्याबाबत बोलणार नाही, असं ते म्हणाले.

जोपर्यंत काँग्रेसचे 300 खासदार निवडून येत नाहीत तोपर्यंत कोणतंही आश्वासन देणं योग्य होणार नाही. काहीही होवो, परमेश्वराच्या कृपेने आमचे 300 खासदार निवडून येवोत. तरच काही तरी होऊ शकेल. पण सध्या तरी असं काही होईल असं वाटत नाही. त्यामुळेच मी खोटं आश्वासन देत नाही आणि 370 कलमावर बोलत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

यापूर्वी आझाद यांनी 370 कलमावर बोलणं अर्थहीन आहे असं म्हटलं होतं. त्यावर यापूर्वी उमर अब्दुल्ला यांनी टीका केली होती. किश्तवाडा येथील एक जनसभेला संबोधित करताना अब्दुल्ला यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावरही आझाद यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मीडियाने माझं विधान चुकीच्या पद्धतीने दाखवलं आहे. 5 ऑगस्ट रोजीच्या निर्णयावर आमची एकजूट, एकल दिशा आहे. या निर्णयामुळे जम्मू काश्मीरमधील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे, असं आझाद यांनी म्हटलं होतं.