येत्या पंधरावड्यात राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ?

257

मुंबई, दि. १६ (पीसीबी) –  आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर   राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.  भाजप अध्यक्ष अमित शहा मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी लालबागच्या गणपतींचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी  मंत्रिमंडळ विस्तारबाबत चर्चा करून हिरवा कंदिल दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे येत्या पंधरावड्यात  मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त निघण्याची  माहिती सूत्रांकडून समजते.  

सध्या भाजपमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीतील नेत्यांसह इतर पक्षातील नेत्यांचे इनकमिंग सुरू आहे. काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह  आणि  राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. तर, पक्षातील काही आमदारांना  मंत्रीपद खुणावत आहे. तर   आगामी निवडणुकीसाठी गोळाबेरीज करण्यासाठी  इतर पक्षातील आयारामांना खुश करावे लागणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार  करण्याचा निर्णय भाजपने घेतल्याचे समजते.

तर दुसरीकडे शिवसेनेच्या मंत्र्यांवर आमदारांमध्ये नाराजीची भावना आहे. सेनेतील काही आमदारांची मंत्रिपदाची इच्छा लपून राहिलेले नाही. त्यामुळे त्यांची मनधरणी करण्यासाठी   शिवसेनेलाही मंत्रिमंडळ विस्ताराची आवश्यकता आहे. त्यातच आगामी निवडणुकांची रणनिती ठरवण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार करणे गरजेचा आहे.