येत्या आठवडाभरात आघाडीचे जागावाटप; मिशन २०१९ ची शरद पवारांची तयारी

121

पुणे, दि. ५ (पीसीबी) – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर  काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत आपल्या तीन बैठका झाल्या आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. दोन्ही पक्षांचे जागावाटप येत्या आठवडाभरात करण्यात येणार असल्याचीही पवार यांनी यावेळी सांगितले.

मात्र, पवार यांनी यावेळी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करणार नसल्याचे स्पष्ट केले. निवडणुकीआधीच उमेदवार जाहीर करण्याची आमची पध्दत नाही, असे सांगून निवडणुकीनंतर याबाबत विचार केला जाईल, असे पवारांनी सांगितले. जागा वाटपाचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य पातळीवरील नेत्यांना देण्यात आला आहे. जागा वाटपामध्ये मोठा पेच   निर्माण झाल्यास मी आणि राहुल गांधी लक्ष घालणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

शिवसेना आणि भाजप या पक्षांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी इतर पक्षांची आघाडी केली जाणार आहे. शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन पक्ष यांचाही समावेश यामध्ये करून घेतला जाईल. भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर भाजपविरोधात आघाडी करण्याच्या प्रयत्नांत आहेत. त्यामध्ये राज्य पातळीवरील नेते प्रतिनिधित्व करतील, असे पवार म्हणाले.