युवतींवरील अत्याचाराला कारणीभूत ठरणारी ‘व्हॅलेंटाइन डे’ची विकृती बंद करा

89

पुणे, दि.१३ (पीसीबी) –  १४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्याची पाश्‍चात्त्यांची कुप्रथा आपल्या देशातही मोठ्या प्रमाणात रूढ झाली आहे. ज्या व्हॅलेंटाइनला ख्रिस्त्यांचे धर्मगुरु पोप यांनीच ‘या नावाचा कोणी संत नाही’ असे सांगून रोमन दिनदर्शिकेतून कधीच हटवले आहे, त्याच्या नावाने भारतात ‘प्रेम दिवस’ साजरा करणे, हे दुर्दैवी आहे. प्रेम दिवस म्हणून ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करू नका आणि लैगिंक अत्याचारांपासून आपल्या पाल्यांना वाचवा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे.

या दिवसाला आम्ही विरोध करण्याची कारणे –

१. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी प्रेम व्यक्त करण्याच्या नादात एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड, विनयभंग, बलात्कार आदी अपराध घडतात; तसेच मद्यपान, धूम्रपान, अमली पदार्थांचे सेवन आदीही गैरकृत्ये केली जातात. हे अत्यंत गंभीर आहे.

२. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने ७ ते १४ फेब्रुवारीच्या दरम्यान कंडोमच्या विक्रीमध्ये २० ते २५ टक्के वाढ होते, तसेच गर्भनिरोधक औषधे आणि गर्भधारणा तपासणी संच (प्रेंग्नन्सी टेस्ट किट) यांच्या विक्रीतही वाढ होते; याशिवाय लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणे, अल्पवयीन मुलींवर अत्याचार होणे, कुमारीमाता बनणे आदी गंभीर समस्या निर्माण होत आहेत. देशात महिलांवरील अत्याचारांत होणारी प्रचंड वाढ पहाता या दुष्परिणामांकडे अत्यंत गांभीर्याने पाहायला हवे !

३. हिंदु संस्कृती ही सर्व प्राणीमात्रांवर सदासर्वकाळ प्रेम करण्यास शिकवते, तर ‘मदर्स डे’, ‘फादर्स डे’, ‘फ्रेंडशिप डे’, ‘व्हॅलेंटाइन डे’ हे एका दिवसापुरते प्रेम करायला शिकवतात. यातून युवा पिढी व्यापक न होता संकुचितच होत आहे.

४. ‘व्हॅलेंटाइन डे’चे स्तोम वाढण्यामागे विदेशी कंपन्या आहेत. युवा पिढीला आकर्षित करण्यासाठी गुलाबाची फुले, हृदयाच्या आकाराचे लाल फुगे, चॉकलेट, भेटवस्तू आदींद्वारे मार्केटिंग करून गल्ला भरला जातो, हे समजून घ्यायला हवे.

५. अमेरिका खंडातील काही देश, तसेच चीन, इटली, स्वीडन, नॉर्थ कोरिया, इथियोपिया आदी देशांत हा दिवस साजरा केला जात नाही; तर पाकिस्तान, इराण, सौदी अरेबिया, इंडोनेशिया, मलेशिया या इस्लामी देशांत व्हॅलेंटाइन डे साजरा केला, तर कडक शिक्षाही आहेत. मग आपण हा दिवस का साजरा करत आहोत, याचा विचार करायला हवा !

६. प्रेम आणि वासना यांतील अंतर हिंदु संस्कृती सांगते, तर वासनेलाच प्रेम समजणारी पाश्‍चात्त्यांची परंपरा आहे. ही शिकवण आज या दिवसाच्या माध्यमातून भारतीय युवा पिढीत वाढत चालली आहे. जी अत्यंत घातक आहे.

या दृष्टीने हिंदु जनजागृती समिती या विषयावर निवेदने देणे, शाळा-महाविद्यालयांत व्याख्याने देणे, पत्रकांचे वितरण करणे, सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रसार करणे आदींद्वारेही जागृती करत आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करून आपण पाश्‍चात्त्यांच्या नीतीहीनतेचे अनुकरण करत आहोत. हिंदु सण हे नैतिकता आणि सदाचार शिकवतात. आपली समृद्ध संस्कृती सोडून अन्य धर्मांतील प्रथा-परंपरांचे पालन करणे, हे एकप्रकारे आपले मानसिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या धर्मांतरच नव्हे का ? यासाठी ‘व्हॅलेंटाइन डे’ची कुप्रथा रोखा अन् हिंदु संस्कृतीनुसार आचरण करा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे.