युती तुटल्यास पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपलाच फायदा; शहरात भाजपचे सत्तास्थान मजबूत होणार

1315

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे शिवसेनेचे नेते जाहीरपणे सांगत असल्यामुळे संपूर्ण राज्यातील राजकीय संदर्भ बदलणार आहेत. पिंपरी-चिंचवडमधील राजकीय समीकरणेही बदलणार आहेत. राजकीय वर्चस्वासाठी भाजप आणि राष्ट्रवादीतच राजकीय संघर्ष होणार असून, या दोन राजकीय पक्षांमधील वादाचा फायदा उठविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असेल. एकूणच भाजपचा चढता राजकीय आलेख लक्षात घेता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेलाच फटका बसू शकतो, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे. असे असले तरी ऐन निवडणुकीच्यावेळी कोण कोणत्या पक्षाकडून लढणार यावर त्या त्या राजकीय पक्षांची कामगिरी अवलंबून असणार आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपासून राज्यात भाजपची ताकद वाढत गेली. सव्वा वर्षापूर्वी झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतही भाजपने स्पष्ट बहुमत प्राप्त करून आपले वर्चस्व सिद्ध केले. विधानसभेनंतर महापालिकेची निवडणूक भाजप-शिवसेना स्वतंत्रपणे लढले होते. तेव्हा भाजपने आपली ताकद दाखवून दिली. हाच कल आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये कायम ठेवण्याचे भाजपपुढे आव्हान आहे. युतीतील शिवसेना या दोन्ही निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे जाहीरपणे सांगत आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका शिवसेनेसाठी प्रतिष्ठेच्या असणार आहेत. भाजपला धडा शिकविण्यासाठी शिवसेना सारी ताकद पणाला लावणार आहे, तर राज्यात पुन्हा पहिल्या क्रमांकावर राहण्यासाठी भाजप सुद्धा साम-दाम-दंड-भेद वापरणार आहे.

सत्तेत एकत्र असलेले भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष आगामी निवडणुकांमध्ये परस्परांच्या जीवावर उठणार असल्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या आशा पल्लवीत होणार आहेत. गेल्या चार वर्षात शहरात भाजपची ताकद वाढली आहे. युती न झाल्यास ही ताकद कमी होईल, असा राष्ट्रवादीचा कयास आहे. युती तुटली तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी यांच्यात तिरंगी लढत होईल. या तिरंगी लढतीचा आपणाला फायदा होण्याची आशा राष्ट्रवादीला असली तरी लोकसभा निवडणुकीत भाजप शहरात प्रथमच खाते उघडेल, अशी राजकीय स्थिती आहे. शहरात शिवसेनेची ताकद मर्यादित असून, भाजपला राष्ट्रवादीच्या तोडीस तोड टक्कर देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असेल. पण त्याचा भाजपच्या यशावर फारसा परिणाम होणार नाही.

शहरात शिवसेनेचे दोन खासदार आहेत आणि भाजपची पाटी कोरी आहे. या दोन्ही खासदारांना जबरदस्त टक्कर देण्याएवढी भाजपने आपली ताकद वाढविली आहे. आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्यामुळे शहरावर भाजपचा जास्त प्रभाव आहे. लोकसभेला भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढल्यास आमदार जगताप हे मावळ मतदारसंघात शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्यासमोर, तर आमदार महेश लांडगे हे शिरूर मतदारसंघात खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासमोर उभे ठाकतील, असे चित्र आहे. लोकसभेला दोन्ही मतदारसंघात लढण्यासाठी राष्ट्रवादीला पात्र उमेदवार मिळण्याचीसुद्धा मारामार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीची इनकमिंगवर जास्त भिस्त असणार आहे. निवडणुकीत भाजप-शिवसेना युती तुटली, तर मतविभागणीचा राष्ट्रवादीला फायदा होणे कठिण आहे. अशा परिस्थिती राष्ट्रवादीकडून शिवसेनेला अंतर्गत मदत होण्याची शक्यता आहे. गेल्यावेळीही असेच झाले होते. परंतु, भाजपला त्याचा फारसा फरक पडेल, असे चित्र नाही.

विधानसभा निवडणुकीत पिंपरी, भोसरी आणि चिंचवड या तीनही मतदारसंघात तिरंगी लढत होईल. परंतु, भाजपमध्ये फाटाफूट झाल्यास या तीनही मतदारसंघात भाजपसमोर कडवे आव्हान असेल. आजच्या राजकीय स्थितीत तीनही मतदारसंघात भाजप विरूद्ध शिवसेना यांच्यातच खरी लढाई होणार असल्याचे चित्र आहे. या निवडणुकांच्या निकालानंतर भाजपची ताकद खऱ्या अर्थाने स्पष्ट होणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्यास शहरात भाजपचे सत्तास्थान अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेबरोबर युती तुटल्याचा भाजपवर फारसा परिणाम होणार नाही. उलट शिवसेनेचेच जास्त नुकसान होणार आहे. युती करायची नाही हा शिवसेनेचा निर्णय पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या पथ्यावरच पडणार आहे.