आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यास पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश असणाऱ्या मावळ आणि शिरूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघावर भाजप दावा करणार असल्याचे पक्षाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी गुरूवारी (दि. १२) पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच आपण स्वतः आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे मावळ आणि शिरूर या दोन्ही मतदारसंघापैकी कोणत्याही मतदारसंघातून भाजपकडून लढू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसने हल्लाबोल आंदोलनात केलेल्या आरोप आणि टिकांना प्रत्युत्तर देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार जगताप बोलत होते. यावेळी आमदार महेश लांडगे, महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, सदाशिव खाडे, प्रमोद निसळ आदी उपस्थित होते.

आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणुकीच्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी तर लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच संपूर्ण महाराष्ट्रात हल्लाबोल आंदोलन करत आहे. त्यामुळे २१ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या पिंपरी-चिंचवडचा समावेश होणाऱ्या मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातही राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. या दोन्ही मतदारसंघात शिवसेनेचे खासदार आहेत. परंतु, लोकसभा निवडणुकीनंतर या दोन्ही मतदारसंघात भाजपने आपले राजकीय स्थान बळकट केले आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होती. त्यानंतर युतीचा घटस्फोट झाला आहे. सत्तेत असूनही दोन्ही पक्ष एकमेकाला पाण्यात बघत आहेत. अशा परिस्थितीत आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती झाली तर आणि युती झाली नाही तर मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती कशी असेल, याचे आडाखे बांधले जात आहेत. अशातच भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती झाल्यास मावळ आणि शिरूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघावर भाजप दावा करणार असल्याबाबत केलेल्या वक्तव्याला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

मावळ आणि शिरूर या दोन्ही मतदारसंघात भाजपची राजकीय ताकद वाढली आहे. या मतदारसंघांमध्ये भाजपचे लोकप्रतिनिधी अधिक आहेत. त्यामुळे हे दोन्ही मतदारसंघ भाजपला मिळायला हवेत, असे आमदार जगताप यांनी म्हटले आहे. तसेच या दोन्ही मतदारसंघातील राजकीय परिस्थिती पाहता आपण स्वतः तसेच भोसरीचे आमदार महेश लांडगे दोन्हींपैकी कोणत्याही मतदारसंघात लढू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आमदार जगताप आणि आमदार लांडगे या दोघांनीही लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे बोलले जात आहे.