युतीची चिंता आम्हालाही, लवकरच निर्णय घेऊ – देवेंद्र फडणवीस

47

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – राज्यात भारतीय जनता पक्षाचेच सरकार पूर्ण बहुमताने येईल आणि देवेंद्र फडणवीस हेच पुढचे मुख्यमंत्री होतील असे भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी युतीच्या विषयाला बगल देत जाहीर केले असले, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र युतीची चिंता आम्हालाही असल्याचे म्हटले आहे. युतीची आवश्यकता असल्याचे अधोरेखित करत मुख्यमंत्र्यांनी युतीबाबतचा निर्णय लवकरच घोषित होईल असेही स्पष्ट केले आहे. युतीबाबत लवकरच चर्चा सुरू होणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पत्रकारांनी नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत प्रश्न विचारल्यानंतर, राणेंच्या पक्षप्रवेशाबाबतचा निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारे घेतलेल्या विविध निर्णयांचे स्वागत केले. विशेषत: मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांच्या कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याच्या निर्णयाचे कौतुक केले.

कॉर्पोरट टॅक्स कमी करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, अर्थमंत्र्यांनी कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याने उद्योगांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही मागणी सातत्याने आपल्या देशातील अर्थतज्ञही करत होते. ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी ट्रे़ड वॉरचा ट्रिपल डाऊन इफेक्ट भारताला परवडण्यासारखा नाही. सरकारने टॅक्स कमी करण्याची हिम्मत दाखवली. या निर्णयाचा महाराष्ट्राला मोठा फायदा आहे. गेल्या २ वर्षांत जागतिक कंपन्या महाराष्ट्रात आल्या. अमेरिका-चीनमधील ट्रेड वॉरमुळे भारतातील गुंतवणूक वाढत असून २२ टक्क्यांचा सर्वात मोठा फायदा राज्याला होईल.