युजीसी बंद करण्याची प्रकाश जावडेकर यांची घोषणा

76

नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) – केंद्र सरकारने विद्यापीठ अनुदान आयोग (युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी उच्च शिक्षण आयोग ( हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया (एचईसीआय) ची स्थापना करण्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे.  

नव्या आयोगाच्या माध्यमातून केवळ संशोधन आणि शिक्षणाच्या गुणवत्तेवर लक्ष देण्यात येणार आहे. विद्यापीठ किंवा महाविद्यालयांना अनुदान देण्याचे काम मंत्रालय करेल. या आयोगाला बोगस संस्था आणि त्यांच्याशी संबंधित लोकांवर कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

त्यासाठी १९५१ चा यूजीसी अॅक्ट संपुष्टात आणत, नवा एचईसीआय अॅक्ट २०१८ लागू करण्यात येणार आहे. प्रकाश जावडेकर यांनी याबाबतचा ड्राफ्ट जारी करून सूचना आणि हरकती मागवल्या आहेत.

यूजीसी केवळ अनुदान देण्यातच व्यस्त होती. शिक्षण संस्थांची गुणवत्ता, संशोधन किंवा मार्गदर्शन याकडे दुर्लक्ष केले जात होते. मात्र, आता नवा आयोग केवळ शैक्षणिक गुणवत्ता, संशोधनावरच लक्ष केंद्रीत करणार असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.