या संकटाच्या काळात राज सुद्धा मला सातत्याने फोन करतात – मुख्यमंत्री

103

मुंबई, दि.२९ (पीसीबी) – राज्यात उद्भवलेल्या करोना आजाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी धीर देण्याबरोबरच इशाराही दिला. त्याचबरोबर या संकटाच्या काळात राज्य सरकारबरोबर सगळेच आहेत. या संकटाच्या काळात महाविकास आघाडीतील सर्वंच नेत्यांबरोबर विरोधी पक्षनेत्यांशीही बोलणे सुरू आहे. राज सुद्धा मला सातत्याने फोन करून सूचना देत आहे,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्यात आणि देशात लॉकडाउन असताना होत असलेल्या स्थलांतराबद्दल मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. ‘संपूर्ण जग सध्या करोनाशी लढत आहे. आज अशी स्थिती आलेली आहे की, कुणीही कुणाच्या मदतीला येऊ शकत नाही. मात्र, महाराष्ट्राला जो काही वेळ मिळाला त्यात आपण आवश्यक ती पावलं उचलली. करोनाविषयी वारंवार मी जनतेशी बोलत आहे. पण, काही जण एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जात असल्याचं दिसत आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे की, कुठेही जाऊ नका. काळजी करून नका. राज्य सरकारने तुमची जबाबदारी घेतली आहे. अडकलेल्या सगळ्यांची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. जशी माहिती मिळत आहे. तशा उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे कुणीही कुठेही जाऊ नका. नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात म्हणून २४ तास ही दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, तरीही गर्दी दिसत आहे. ती थांबवा अन्यथा सरकारला कठोर पाऊल उचलावं लागेल,’ असा आवाहन वजा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, ‘या संकटाच्या काळात सगळेच माझ्यासोबत आहे. जनतेचे सहकार्य मिळतेच आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीत असलेल्या तिन्ही पक्षातील नेते मग ते उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, अनिल देशमुख यांच्यासह सगळेच सोबत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही चर्चा सुरू आहे. राज (राज ठाकरे) सुद्धा मला सतत फोनवरून बोलतो आहे. सरकारने काय करायला हवं. राजही त्याच्या सूचना मला देतोय,’ असे उद्धव ठाकरे यांनी प्रामुख्यानं नमूद केले.

 

 

WhatsAppShare