‘या’ विभागांनी समन्वय साधूनचं रस्ते खोदाई करावी; अन्यथा…… आयुक्त राजेश पाटलांचा इशारा

56

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांच्या वारंवार खोदाईबाबत नागरिक बाधित होत आहेत. लोकप्रतिनिधींच्या तक्रारी येत आहेत. याबाबत स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठा आदी विभागांनी एकमेकांशी समन्वय साधून त्याबाबत नियोजन करावे. त्यानंतरच खोदाई करावी; अन्यथा जबाबदार अधिका-यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त राजेश पाटील यांनी दिला.

पालिकेच्या अ क्षेत्रीय कार्यालयात आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग क्रमांक 15, 19 मधील समस्यांबाबत नगरसदस्य आणि अधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत त्यांनी उपस्थित अधिका-यांना आदेश दिले. अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसदस्य अमित गावडे, शैलेश मोरे, नगरसदस्या शैलजा मोरे, जयश्री गावडे, कोमल मेवाणी, प्रभाग अधिकारी सुचेता पानसरे, स्थापत्य, अतिक्रमण, विद्युत, नगररचना, पाणीपुरवठा, उद्यान, आरोग्य, वैद्यकीय आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीस उपस्थित नगरसदस्यांनी विविध समस्या आयुक्त राजेश पाटील यांच्यासमोर मांडल्या. रस्त्यावरील दिव्यांच्या खांबांखाली झाडांच्या फांद्यांमुळे दिव्यांचा प्रकाश रस्त्यावर पडत नाही. गणेश तलाव येथे मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. एल.आय.सी. कॉलनीतील पालिकेच्या दवाखान्यात पाणी साचल्याने समस्या निर्माण झाली. दवाखान्यांस जागा जागा अपुरी पडत असल्याने दवाखाना अन्यत्र स्थलांतरित करावा. पाणीपुरवठ्यात अनियमितता, भाटनगर, आनंदनगर, पत्राशेड भागातील ड्रेनेज समस्या नगरसदस्यांनी यावेळी आयुक्तांसमोर मांडल्या.

तसेच महात्मा बसवेश्वर चौक व अग्रसेन मंदिराजवळ जंगल वाढले आहे. हेडगेवार भवनाजवळ वॉर्ड ऐवजी संपूर्ण क्षेत्रीय कार्यालयांच्या कच-याच्या गाड्यांचे वाहनतळ झाले आहे. पे अँड पार्कची समस्या नागरिकांना भेडसावत आहे, असे मुद्देही नगरसदस्यांनी उपस्थित केले. त्यावर आयुक्त राजेश पाटील म्हणाले, नगरसदस्यांनी उपस्थित केलेल्या समस्यांची दखल घेण्यात आलेली आहे. रस्ते खोदाई करण्यापूर्वी संबधित विभाग संलग्न विभागाशी समन्वय साधून मगच खोदाई करेल. यामुळे वारंवार होणा-या खोदाईचा त्रास नागरिकांना होणार नाही. उद्यान विभागाने तातडीने रस्त्यावरील दिव्यांच्या खांबाखालील झाडांचा विस्तार कमी करावा. रस्त्यावर पुरेसा उजेड असला पाहिजे. मोकाट कुत्र्यांबाबत थोड्याच दिवसांत उपाययोजना करण्यात येणार आहे. गणेश तलावातील गाळ काढण्याचा आदेश दिलेला आहे. त्याची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी.

नवीन बदली झालेल्या अधिका-यांनी क्षेत्राची पाहणी करावी व कामकाज समजून त्याबाबत नगरसदस्यांना वेळोवेळी अवगत करावे. कच-याच्या समस्येबाबत लोक सहभागातून व्यवस्थापन करण्यात येणार आहे. याबाबत जनजागृती करण्यात येईल तसेच कचरा संकलन करणा-या गाड्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे असे स्पष्ट करून आयुक्त पाटील यांनी सर्व अधिका-यांना कामामध्ये तत्पर राहण्याबाबतचे आदेश दिले.

WhatsAppShare