…या निमित्ताने छगन भुजबळ – उद्धव ठाकरे यांची झाली भेट!

346

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली. निमित्त ठरले एका लग्नाचे! भुजबळांनी शिवसेना सोडल्यानंतर दोघा नेत्यांमध्ये मोठी दरी निर्माण झाली होती. मात्र, भुजबळ  तुरुंगातून बाहेर आल्यानंतर    त्यांच्याबद्दल उध्दव ठाकरे यांनी  सहानुभुती व्यक्त केली  होती.  

शनिवारी (दि.२५)  वरळीत पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त पद्मनाथन यांच्या मुलाचे लग्न होते. या लग्नाला दोघांचीही उपस्थिती होती . यावेळी उद्धव ठाकरेंसोबत शिवसेना खासदार संजय राऊतही उपस्थित होते. या भेटीत दोघांमध्ये कशावर चर्चा झाली, हे समजू शकलेले नाही. मात्र, यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर भुजबळांविषयी ‘सामना’ या मुखपत्रातून सहानुभूती व्यक्त करण्यात आली होती. यावर आमचे २५ वर्षांपासून ऋणानुबंध आहेत,  अशी प्रतिक्रीया छगन भुजबळ यांनी दिली होती.

दरम्यान, भुजबळांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी समीर यांना छगन भुजबळांच्या प्रकृतीची काळजी घ्या, असा  सल्ला दिला होता.