‘या’ कारणामुळे अभिनेत्री दिपाली सय्यद शिवसंग्राम पक्षात प्रवेश करणार

1296

पुणे, दि. ११ (पीसीबी) –  स्वाभिमानाने राजकारणात काम करण्याची आणि सामाजिक  कार्य करण्याची खात्री असल्याने मी शिवसंग्राम पक्षात प्रवेश करत आहे, असे अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी सांगितले. पुण्यामध्ये विनायक मेटे  यांच्या उपस्थितीमध्ये आज (मंगळवार) दिपाली सय्यद  शिवसंग्राम पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत.  

दरम्यान, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दिपाली सय्यद ‘आप’ च्या तिकीटावर  नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून रिंगणात होत्या. मात्र, आता त्यांनी राजकारणात पुन्हा सक्रीय होण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षपदाची जबाबादारी त्यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे. माझा स्वाभिमान जपता येईल, मला माझ्या मनातील जनसेवेचे काम करता येईल, याची खात्री झाल्याने मी शिवसंग्राम पक्षात प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले.

आगामी काळात लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक  लढवणार का? या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, भविष्यातील योजनांबद्दल आताच बोलणे योग्य होणार नाही. आता मी पक्षात प्रवेश करून कामाला सुरूवात करत आहे, असे त्या म्हणाल्या.