या कारणांमुळे अर्णब गोस्वामींना तब्बल २० हजार पौंडांचा दंड

45

मुंबई, दि. 23 (पीसीबी): रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आंतरराष्ट्रीय झटका बसला आहे. युकेमधील कम्युनिकेशन्स नियामक कार्यालय ऑफकॉमने Worldview Media Network Limited ला तब्बल २० हजार पौंड (जवळपास १९ लाख ७३ हजार रुपये) दंड ठोठावला आहे. वर्ल्डव्यू मीडिया नेटवर्ककडे युकेमधील रिपब्लिक भारतची जबाबदारी आहे. रिपब्लिकचा युकेमधील हिंदी भाषिकांपर्यंत या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न आहे. प्रसारणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला आहे.

६ डिसेंबरला रिपब्लिक भारतचा ‘पूंछता है भारत’ कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पाकिस्तानी नागरिकांविरोधात द्वेषयुक्त आणि भडकवणारी भाषा वापरत प्रसारणाच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. कम्युनिकेशन्स नियामक कार्यालयाकडून कारवाईची माहिती देत सांगण्यात आलं आहे की, “ऑफकॉमने चॅनेलला यावर स्पष्टीकरण देण्यास सांगितलं असून पुन्हा तो कार्यक्रम प्रसारित न करण्याच्या सूचना केल्या आहेत”. ऑफकॉमने दिलेल्या माहितीनुसार, “रिपल्बिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींनी भारताच्या चांद्रयान २ मोहिमेसंदर्भात कार्यक्रम करताना भारताच्या अवकाश तसंच तांत्रिक विकासाची पाकिस्तानशी तुलना केली होती. पाकिस्तानकडून भारताविरोध होणाऱ्या दहशतवादी कारवायांचाही त्यात उल्लेख होता”.
चर्चेदरम्यान अर्णब गोस्वामी आणि सहभागी पाहुण्यांना केलेल्या कमेंट पाकिस्तानी लोकांविरोधात द्वेष निर्माण करणाऱ्या होत्या असं ऑफकॉमने सांगितलं आहे. कार्यक्रमात वारंवार पाकिस्तानी नागरिकांचा उल्लेख दहशतवादी, माकडं, गाढवं, भिकारी आणि चोर असा करण्यात आल्याचंही सांगण्यात आलं.

“पाकिस्तानचे शास्त्रज्ञ, डॉक्टर, नेते सर्वजण दहशतावादी आहेत. त्यांचे खेळाडूदेखील…तेथील प्रत्येक लहान मूल दहशतवादी आहे. तुम्ही दहशतवाद्यांविरोधात लढत आहात,” असं अर्णब गोस्वामी यांनी कार्यक्रमात म्हटलं होतं असा उल्लेख ऑफकॉमने प्रसिद्धीपत्रकात केला आहे. कार्यक्रमात ‘पाकी’ शब्दाचा उल्लेख केल्याबद्दलही ऑफकॉमने आक्षेप नोंदवला आहे. हा वर्णद्वेषी शब्द असून युकेमधील नागरिकांना मंजूर नाही असं त्यांनी सांगितलं आहे.

WhatsAppShare