‘या’ कामासाठी मुख्यमंत्री फडणवीस करणार उध्दव ठाकरेंचा गौरव

268

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे एक छायाचित्रकार म्हणून  उत्कृष्ट आहेत. त्यांना पुरस्कार देण्याची वेळ आलीच तर आपण एक उत्कृष्ट छायाचित्रकार म्हणून त्यांना पुरस्कार देऊ, अशी इच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त् केली.    एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एका प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी आपली इच्छा बोलून दाखवली.  

या मुलाखतीवेळी उद्धव ठाकरेही  उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर उद्धव ठाकरे म्हणाले की, एक सच्चा मित्र म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुरस्कार द्यायला आवडेल.  भाजप आणि शिवसेनेमध्ये सध्या कोल्डवार सुरू आहे. मात्र, या  दोन पक्षांचे दिग्गज नेते जेव्हा एकाच व्यासपीठावर आले, तेव्हा त्यांनी एकमेकांबाबत गौरवोद्गार  काढून वातावरण हलके केले.

या मुलाखतीत या दोघांनीही दिलखुलास उत्तरे दिली. उद्धव ठाकरे यांच्यातला कोणता गुण आवडतो असे विचारले असता उद्धव ठाकरे यांच्या ओठात एक पोटात एक नसते, असा गुण पाहायला मिळत नाही, असे उत्तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातला सच्चेपणा आपल्याला भावतो, सचोटी हा त्यांचा गुण आहे. त्याचमुळे त्यांचे नाव जेव्हा मुख्यमंत्रीपदासाठी पुढे आले होते. तेव्हा मी त्यांच्या नावाला पाठिंबा दिला होता, असेही  उद्धव ठाकरे यांनी सांगितले.