यशवंत सिन्हा यांनी लोकसभा निवडणूक लढवावी – अरविंद केजरीवाल

149

नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) – मोदी सरकारवर सातत्याने टीकेची झोड उठविणारे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, अशी विनंती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. नोएडा येथील ‘आप’च्या जन अधिकार यात्राच्या समारोपाच्या कार्यक्रमात केजरीवाल बोलत होते. मात्र, सिन्हा यांनी कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवावी, यावर केजरीवाल यांनी काहीही भाष्य केले नाही.

आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली आयोजित पदयात्रेच्या समारोप प्रसंगी येथे ‘जन अधिकार’ रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी अरविंद केजरीवाल, खासदार संजय सिंह यांच्यासह भाजप नेते यशवंत सिन्हा आणि भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा आदी  उपस्थित होते.

यावेळी केजरीवाल म्हणाले की, काही दिवसांपूर्वी यशवंत सिन्हा यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र, तुमच्या सारखी चांगली माणसे निवडणूक लढवणार नाहीत, तर मग कोण लढवणार? असा सवाल त्यांनी सिन्हा यांना केला. केजरीवाल यांच्या या विनंतीवर यशवंत सिन्हा यांच्याकडून मात्र, अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

दरम्यान, यशवंत सिन्हा यांनी नोटाबंदीच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.  या सभेमध्ये त्यांनी नोटाबंदीच्या निर्णयावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले. नोटबंदीचा निर्णय पूर्णपणे फसला आहे, असे सांगत त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर तोफ डागली.