यशवंतराव चव्हाण स्मारकाची रक्कम वायसीएम रुग्णालयातील रुग्ण सुविधेवर खर्च करण्याची मागणी

87

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेने निगडी प्राधिकरण येथे यशवंतराव चव्हाण स्मारक उभारण्यासाठी ५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. ही रक्कम स्मारकासाठी न देता पिंपरी, संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णायलयातील (वायसीएम) रुग्ण सुविधा सुधारण्यासाठी खर्च करावेत, अशी मागणी भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात काळभोर यांनी महापालिका आयुक्तांकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, यशवंतराव चव्हाण यांचे निगडी येथे स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठीचा ठराव स्थायी समिती समोर मांडण्यात आला होता. पिंपरी महापालिकेच्या १६ मे २०१८ रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत या ठरावाला मंजुरी देण्यात आली होती. मात्र हे ५ कोटी रुपयांची रक्कम स्मारकासाठी न कर्च करता महापालिका प्रशासनाने वायसीएम रुग्णालयातील रुग्णांच्या सुविधेसाठी खर्च करावेत.

वायसीएम रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी किंवा आरामासाठी कोणत्याही प्रकारची महापालिका प्रशासनाने सुविधा उपलब्ध केलेली नाही. त्यामुळे स्मारकासाठी खर्च होणारे ५ कोटी रुपये वायसीएम रुग्णालायातील रुग्णांच्या सुविधेसाठी खर्च करावे, असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.