यवतमध्ये पोलिसांवर दगडफेक; वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर जखमी

115

यवत, दि. ३ (पीसीबी) – दोन गटातील भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या एका पोलिस निरीक्षकावर दगडफेक करुन त्याला गंभीर जखमी करण्यात आले आहे. या दगडफेकीमध्ये पोलीस निरीक्षकासह काही पोलिस कर्मचारी देखील जखमी झाले आहे. ही घटना गुरुवारी (दि. २) रात्री पावणेबाराच्या सुमारास घडली.

यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर असे दगड लागून गंभीर जखमी  झालेल्या पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी जमावाविरुद्ध एका पोलीस कर्मचाऱ्याने यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गुरुवारी रात्री पावनेबाराच्या सुमारास यवत येथील धायगुडवाडी-बोरीपार्धी येथे एका महिलेची आणि एका पुरुषाची भांडणे झाली होती. यामधून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. तणाव वाढत चालल्याने  यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी मद्यस्ती करुन दोन्ही गटातील लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र एका जमावातील काही तरुणांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली.  यामध्ये पोलिस निरीक्षक बंडगर यांच्या चेहऱ्यावर दगड लागल्याने ते गंभीर जखमी झाले. तसेच काही पोलिस कर्मचारी देखील जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यवत पोलिस तपास करत आहेत.