यंदा मान्सून ६ जूनला केरळात धडकणार; भारतीय हवामान विभागाचा अंदाज  

499

नवी दिल्ली,   दि. १५ (पीसीबी) –  दुष्काळाच्या चटक्यांनी  हैराण झालेल्या भारतातील शेतकऱ्यांना यंदाही दिलासा मिळण्याची शक्यता दिसत  नाही.  यंदा मान्सूनचे उशीरा आगमन म्हणजे  ६ जून रोजी केरळमध्ये  होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.  त्यामुळे  महाराष्ट्रातही मान्सून  उशीरा दाखल होणार आहे. 

केरळच्या समुद्रकिनाऱ्यावर ६ जून रोजी मान्सूनचे आगमन होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्यानंतर सहा ते सात दिवसांनी महाराष्ट्रातही दाखल होतो. मात्र, यंदा केरळमध्येच उशिराने आगमन होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही मान्सून प्रतीक्षा करायला लावण्याची शक्यता आहेत.

गेल्या मोसमात महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाड्याला मोठा दुष्काळाचा फटका बसला आहे. यंदाही मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मान्सून हुलकावणी देण्याची चिन्हे आहेत. मध्य भारतात समावेश होणाऱ्या विदर्भ, मराठवाडा, पश्चिम मध्य प्रदेश व गुजरातमध्ये यंदा सरासरीच्या ९१ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मान्सूनदरम्यान सामान्यपेक्षा अतिशय जास्त (११० टक्क्यांपेक्षा जास्त) पावसाची शक्यता २ टक्के आहे, तर सामान्यपेक्षा जास्त (१०४-११० टक्के) पावसाची शक्यता १० टक्के आहे. याशिवाय सामान्य म्हणजेच ९६-१०४ टक्के पावसाची शक्यता ३९ टक्के आहे. म्हणजेच एकत्रित सामान्य किंवा सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, सामन्यपेक्षा थोडा कमी म्हणजेच ९०- ९६ टक्के पावसाची शक्यता ३२ टक्के आणि ९० टक्क्यांपेक्षा कमी पावसाची शक्यता १६ टक्के आहे. मान्सूनदरम्यान जर९० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला तर दुष्काळ जाहीर होतो.

दरम्यान, नैऋत्य मोसमी मान्सूनचे यंदा १ जून ऐवजी ४ जूनला भारतात आगमन होणार आहे, अशी माहिती स्कायमेट या खासगी अभ्यास करणाऱ्या संस्थेने दिली आहे. त्याचबरोबर  महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात कमी पाऊस पडेल, अशी शक्यताही स्कायमेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन सिंह यांनी वर्तवली आहे. आता भारतीय हवामान विभागानेही मान्सूनचे आगमन उशीरा होण्याचा अंदाज वर्तविला आहे.

 

WhatsAppShare