यंदाही बिनधास्त धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करा – राज ठाकरे

164

मुंबई, दि. १ (पीसीबी) – प्रत्येक वेळी हिंदूंच्याच सणांना का आडकाठी केली जाते, असा संतप्त सवाल करत  गणेश मंडळांनी गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही बिनधास्त धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले  आहे.

मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गणेश मंडळांना मंडपासाठी अटी लावल्या आहेत. दक्षिण मुंबई, गिरगाव या भागातील गणेश मंडळांना मंडपासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज (बुधवारी) राज ठाकरे यांनी गिरगावला भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

गेली ६० ते ७० वर्षे गिरगावात गणेशोत्सव साजरा होत आहे. मात्र आत्ताच याबाबत तक्रार आलेली आहेत. गणेशोत्सव वर्षातून एकदा दहा दिवस असतो. मग त्यासाठी आडकाठी  का ? असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी केला. मशिदीवरचे रोजचे भोंगे बंद करत नाहीत, मग वर्षातून एकदा येणाऱ्या गणेशोत्सवाच्याच बाबतीत ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा का आठवतो, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.