‘…म्हणून हॉटेलमध्ये बिर्याणी घेण्यासाठी गेलेल्या ग्राहकाला बेदम मारलं’

94

भोसरी, दि. ४ (पीसीबी) – हॉटेलमध्ये बिर्याणी घेण्यासाठी गेलेल्या ग्राहकाला हॉटेलमधील तिघांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 3) दुपारी दिघी रोड भोसरी येथील हॉटेल दावत बिर्याणी हाऊस समोर घडली.

नागनाथ शिवाजी सोळंके (वय 33 रा. भोसरी) असे मारहाण झालेल्या ग्राहकाचे नाव आहे. त्यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तुकाराम बालाजी लवटे (वय 21, रा. हॉटेल दावत बिर्यानी हाऊस, दिघी रोड भोसरी) आणि त्याच्या दोन साथीदारांचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी आरोपी तुकाराम लवटे याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास फिर्यादी सोळंके दिघी रोड भोसरी येथील हॉटेल दावत बिर्याणी हाऊसमध्ये बिर्याणी आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी हॉटेलमधील एका अनोळखी कामगाराने फिर्यादी यांना बिर्याणी संपल्याचे सांगितले. हॉटेलमधील काउंटरवर बसलेल्या मॅनेजरने फिर्यादी यांना ओळखत असल्याचे सांगूनही हॉटेलमधील कामगाराने फिर्यादी यांना बिर्याणी न देता ‘येथून निघून जा’ अशी दमदाटी केली.

‘माझ्या समोरील गाडी गेल्यावर मी जातो’ असे फिर्यादी यांनी सांगितले असता तिघा आरोपींनी फिर्यादी यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. यात फिर्यादी यांच्या पायाच्या लडकीला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली. आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ करून दमदाटी देखील केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare