‘…म्हणून शिवसेनेचा जळफळाट सुरू आहे’; नारायण राणेंचं शिवसेनेवर टीकास्त्र

102

मुंबई, दि.२७ (पीसीबी) : पूरपरिस्थितीवरून विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप करत शिवसेनेने विरोधकांवर हल्ला चढवला होता. त्याला केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे प्रत्युत्तर दिलं आहे. जनतेच्या आक्रोशाने शिवसेना हादरली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून त्यांचा जळफळाट सुरू झाला आहे, असा घणाघाती हल्ला नारायण राणे यांनी चढवला आहे.

नारायण राणे यांनी ट्विट करून शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. गेल्या दोन दिवसांपासून दैनिक सामनाच्या अग्रलेखातून विरोधकांवर टीका करण्यात आली आहे. त्याला राणेंनी ट्विटमधून उत्तर दिलं आहे. जनता आता समोर येऊन राग व्‍यक्‍त करू लागल्‍यामुळे शिवसेना हादरून गेली आहे. त्‍यामुळेच सामनामध्‍ये एकाच विषयावर लागोपाठ दोन दिवस अग्रलेखातून जळफळाट झाला. लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणे आणि लोकहीत जोपासणे याचा शिवसेनेशी कोणताही संबंध राहिलेला नाही हेच यावरून सिध्‍द होते, असं सांगतानाच लोकांच्या संकटाचे राजकारण आम्ही करत नाही. मोटार चालविण्‍याचे कौतुकही करून घेत नाही. अशा प्रसंगी तळी उचलण्याची सवयच असलेल्याना तळी उचलू द्या आम्ही लोकांची सेवा करू, असा टोला राणेंनी लगावला आहे.

शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून विरोधकांवर टीका करण्यात आली आहे. विरोधकांचा पूरग्रस्त भागाचा दौरा म्हणजे राजकीय पर्यटन असल्याची टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील दुर्घटनाग्रस्त भागांत राजकीय पर्यटन सुरू झाले आहे. ते थांबले तर मदत आणि पुनर्वसन कार्यास अधिक गती येईल. महाड, चिपळूणला सगळय़ात जास्त फटका बसला. तळीये गावातील दुर्घटना भयंकर आहे. तेथे 82 जणांचा मृत्यू झाला. 32 जण अद्यापही बेपत्ता आहेत. सुरुवातीला जोरदार पावसामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण झाले, पण या अडथळय़ांतून सरकारी यंत्रणा मार्ग काढीत असतानाच ‘राजकीय पर्यटना’ने यंत्रणेलाच धारेवर धरायला सुरुवात केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात बसून सरकारी यंत्रणेस कामाला जुंपत असतानाच तिकडे विधान परिषदेचे ‘वि. प. ने.’ दरेकर व माजी मंत्री महाजन हे धावाधाव करीत महाडला पोहोचायचा प्रयत्न करू लागले. शेवटी पाण्याच्या प्रवाहात त्यांना गटांगळ्या खाव्या लागल्या व सरकारी यंत्रणेस होडय़ा वगैरे घेऊन त्यांना वाचवावे लागले, असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

मुख्यमंत्री, मुख्य सचिव, पालकमंत्री यांनी घटनास्थळी जाऊन आढावा घेणे, सूचना देणे हे गरजेचेच असते. पण मुख्यमंत्र्यांपाठोपाठ केंद्रीय मंत्री नारायण राणे, देवेंद्र फडणवीस त्यांचा फौजफाटा घेऊन तळियेत पोहोचले. आता महाराष्ट्राचे महामहिम राज्यपालही तेथे निघाले आहेत. तिकडे मदतकार्य सुरू आहे. सरकारी यंत्रणा या कामात गुंतली आहे आणि इथे अशा या पर्यटनाने गोंधळात गोंधळ वाढत आहे. पुन्हा या अशा राजकीय पर्यटनाचे गांभीर्य किती व फोटोबाजी किती हा प्रश्न आहेच. त्यात दोन दिवसांपूर्वी तळियेत केंद्रीय मंत्री गेले व जाहीर केले की, ग्रामस्थांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून देऊ. प्रश्न आव्हाड घरे बांधून देतील की केंद्राच्या मदतीने राणे, हा विषय नाही. या संकटसमयी सरकारविरोधकांनी मढय़ावरचे लोणी खाण्याचा प्रयत्न करू नये हेच सांगणे आहे, असेही शिवसेनेनं म्हटलं आहे.

WhatsAppShare