…म्हणून राहुल गांधींनी माझी गळाभेट घेतली – पंतप्रधान मोदी

159

शाहजहापूर, दि. २१ (पीसीबी) – . केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव का आणला, याचे कारणच काँग्रेस अध्यक्ष  राहुल गांधींना सांगता येत नव्हते. त्यांची गोची झाली होती. त्यामुळेच ते माझ्या गळ्यात पडले,’ असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला.  

शाहजहापूर येथे आज (शनिवार) शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोदी बोलत होते. ‘आमच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव का आणला, असे आम्ही वारंवार विरोधकांना विचारत होतो. काहीतरी कारण द्या अशी विनवणी करत होतो. पण त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नव्हते. अशा परिस्थितीत काय करायचे, असा विचार करून ते माझ्या गळ्यात पडले’, असे मोदी म्हणाले.

‘भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या विरोधात आमचे सरकार लढा देत असल्याने आमच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला. विविध योजनांचे ९० हजार कोटी रुपये आता योग्य व्यक्तींच्या हातात पडत आहेत. त्यामुळे अनेकांची दुकाने बंद झाली आहेत, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधानाच्या खुर्चीशिवाय त्यांना काही दिसत नाही. ना देश दिसतो ना देशातील गरीब. मात्र    आमच्याकडे देशातील जनता व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेची ताकद आहे,’ असे मोदी म्हणाले. अनेक दल (पक्ष) भाजपविरोधात एकत्र येत असल्याने नुसती दलदल  झाली आहे.  दलदलीत नेहमी कमळच फुलते,’ असेही मोदी म्हणाले.