…म्हणून मोदींना पत्रकार परिषद घ्यावी वाटली – अशोक चव्हाण

145

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही व्यासपीठावर उपस्थित होते. मात्र, मोदींनी एकाही प्रश्नांचे उत्तर दिले नाही. यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. देशात मोदी-शहा जोडीचा प्रयोग फसला आहे. म्हणूनच ५ वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या तोंडावर पत्रकार परिषद घ्यावी लागली,  अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी  केली आहे.

मोदी सरकारच्या कार्यकाळात देशाचे मोठे नुकसान झाले आहे. या निवडणुकीत मात्र परिवर्तन होणार आहे. पाच वर्षांनंतर  पंतप्रधानांना पत्रकार परिषद  घ्यावी वाटली,  हा बदल का झाला. कारण लोकांची नाराजी त्यांना समजली आहे, असेही चव्हाण यांनी  म्हटले आहे.

दरम्यान, मोदी यांनी पत्रकारांच्या एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही.  पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी ही पत्रकार परिषद पक्षाच्या अध्यक्षांची आहे.  त्यामुळे मी उत्तर देणे योग्य  नाही, असे त्यांनी सांगितले.  या पत्रकार परिषदेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत   पंतप्रधानांची पत्रकार परिषद…मौन की बात”,असा टोला लगावला आहे.