…… म्हणून जावयानेच केला सासूचा खून

64

पुणे, दि. २ (पीसीबी) – दररोज होणाऱ्या भांडणाला कंटाळून जावयाने सासूचा ओढणीने गळा आवळून खून केलाय. बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री नऊ वाजता हा प्रकार घडला. अनारकली महंमद तेरणे (वय 45) असे खून झालेल्या सासूचे नाव आहे. तर याप्रकरणी जावई आसिफ दस्तगीर आत्तार (वय 26) याला अटक केली आहे. याबाबत मौलाली मंजलापुरे (वय 31) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी, फिर्यादी आणि मयत व्यक्ती हे तिघेही कर्नाटक राज्यातील रहिवासी आहेत. मागील काही दिवसांपासून ते बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील इंदिरानगर येथील शेळके वस्तीत राहत होते. आरोपी असिफ अत्तार हा मिळेल ती कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता.

दरम्यान घरातील किरकोळ कारणावरून त्याचे पत्नी आणि सासू सोबत दररोज भांडण व्हायचे. शनिवारी देखील त्यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्यानंतर आरोपीने रागाच्या भरात सासूला मारहाण केली आणि ओढणीने गळा आवळून खून केला. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आरोपीला अटकही करण्यात आली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक उसगावकर हे करत आहेत.

WhatsAppShare