‘…. म्हणून चंद्रकांत पाटलांनी अग्रलेखाला दिलेलं उत्तर ‘सामना’ ने जसंच्या तसं छापलं!

47

मुंबई, दि.२२ (पीसीबी) : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सामनामध्ये 21 सप्टेंबरला प्रसिद्ध झालेल्य तोंडास फेस कोणाच्या? या अग्रलेखावर उत्तर देणारं पत्र सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना लिहिलं आहे. विशेष बाब म्हणजे सामनाच्या संपादकीयमध्ये चंद्रकांत पाटील यांचं पत्र जसंच्या तसं छापण्यात आलं आहे. ‘सामना’चे धन्यवाद! चंद्रकांतदादांच्या लेखणीला फेस! अहंकाराचे बुडबुडे!! याअंतर्गत चंद्रकांत पाटील यांचं पत्र छापण्यात आलं आहे.लिहिलेल्या अग्रलेखाबद्दल हे आभार आहेत. वृत्तपत्राचा अग्रलेख हा संपादकाच्या नावे ओळखला जातो आणि ‘सामना’च्या संपादक रश्मी उद्धव ठाकरे आहेत. तथापि, आपण कार्यकारी संपादक आहात आणि आपणच अग्रलेख लिहिता असा सार्वत्रिक समज असल्याने तुमचे आभार मानले.

तुम्ही माझ्यावर या अग्रलेखात बरीच चिखलफेक केली आहे. पण तुम्हाला मी जाब देणे प्रोटोकॉलनुसार योग्य नाही. म्हणजे राजकीयदृष्ट्या बरोबरी नाही, अशा अर्थाने शब्द वापरला. नुकतेच मी एका नेत्याबद्दल पाठीत खंजीर खुपसला, असा वाक्प्रचार वापरला तर तुम्ही पाठीत खंजीर खुपसल्याचा पुरावा मागितला. पाठीत खंजीर खुपसणे म्हणजे विश्वासघात करणे एवढाही अर्थ तुम्हाला संपादक असून माहिती नाही. त्यामुळे प्रोटोकॉल शब्द का वापरला हे सांगितले. विशेष म्हणजे तुमच्या पक्षाचे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनीही आज हाच वाक्प्रचार वापरला. मी हा वाक्प्रचार वापरल्यानंतर तुमच्या पक्षातील लोकांचे धाडस वाढलेले दिसते, असं चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

तुम्ही अग्रलेखात लिहिले आहे की, ‘हसन मुश्रीफ यांना धमकावले की, ईडीशी लढताना तोंडाला फेस येईल. पाटील यांना ईडीचा अनुभव कधीपासून आला?’ संजयराव तुमचा प्रश्न रास्त आहे. मला ईडीचा अनुभव नाही. तो येण्यासाठी भरपूर काळा पैसा असावा लागतो. आर्थिक गैरव्यवहार केले की, ईडीचा अनुभव येतो. तुमच्या पत्नीला पीएमसी बँक घोटाळ्यातून निघालेले पन्नास लाख रुपये मिळाले आणि या बेहिशेबी प्राप्तीबद्दल चौकशीसाठी ईडीने नोटीस बजावल्यानंतर तुम्ही हैराण झाला होता. अखेर बरीच धावपळ करु, ते पैसे परत देऊन प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न तुम्ही धापा टाकत केलात. हे सर्व पाहिल्यावरुन मी अंदाज बांधला की, पन्नास लाखांसाठी एवढा त्रास होत असेल तर 127 कोटींसाठी नक्कीच फेस येणार.

कोल्हापूरचा पैलवान गडी मुश्रीफ तर कुणालाही ऐकणार नाही, असा दावाही तुम्ही केलात. पण वस्तुस्थिती वेगळीच आहे. किरीट सोमय्या यांनी एक आरोप केला तर मुश्रीफ थेट बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आणि तेच आडवे झाले. मग हे गडी पैलवान कसे आहेत, हे तरी सांगा. तुम्ही म्हटले आहे की, कालच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात भाजपचा सुपडा साफ झाला. पण कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचा पराभव झाला त्याचा तुम्हाला आनंद झाला की काय? कोल्हापूर जिल्ह्यात भाजपा शिवसेनेबरोबर युती करुन आणि जागावाटप करुनच लढली होती, हे विसरलात की काय? यात शिवसेना सहापैकी पाच जागांवर पराभूत झाली आणि एकच आमदार उरला, हे माहितीसाठी.

राष्ट्रवादी काँग्रेसचा उदो उदो करताना तुम्ही शिवसेनेलाही सुपडा साफ म्हणायला कमी करत नाही. शरद पवारांवर कोणी टीका केली की त्यांचे प्रवक्ते असल्यासारखे तुम्ही अंगावर येता. तुमच्या मध्यस्थीने आणि पुढाकाराने शिवसेनेने भाजपासोबतची युती तोडली आणि काँग्रेससोबत हातमिळवणी करुन सत्ता मिळवली. पण तुमच्या उद्योगामुळे शिवसेना किती अडचणीत आली याची तुम्हाला पर्वा नाही. उद्धवरावांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळाली, पण खरे अधिकार राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले. शिवसेनेच्या इतर बहुतांश नेत्यांना तर खुर्चीसुद्धा मिळाली नाही. या प्रकारात शिवसेनेला ना घर का ना घाट का असे करुन ठेवले… तुम्ही सातत्याने शरद पवारांचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे भजन करत असता त्याबद्दल माझे काही म्हणणे नाही. तुम्ही पलटी मारली असेल तर तो तुमच्या पक्षप्रमुखांचा प्रश्न आहे, असंची चंद्रकांत पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना लिहिलेल्या पत्रात तुमच्यामुळं संघ परिवार, भाजपचा मतदार दुखावलाय, शिवसेनेचा मतदार अस्वस्थ झालाय. माझ्यावेळी तुम्ही टीका करता त्यावेळी माझ्याविषयी चांगला मेसेज जातो. राजकारणात मित्रांइतके शत्रू महत्वाचे असतात. राजकारणात निगेटिव्ह पब्लिसिटीचा उपयोग असतो. सज्जनांनी टीका केली तर धोका असतो, तुमच्या सारख्यांच्या टीकेचा फायदाच होतो, असं चंद्रकांत पाटलांनी संजय राऊत यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

सामनातून चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिक्रियेवर टीका करण्यात आलीय. एखाद्या नेत्याचे पाय जमिनीवर नसले व त्या नेत्याला वैफल्यानं ग्रासल्यास गाडी कशी उताराला लागते याचा नमुना म्हणजे चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया असल्याचा टोला सामनातून लागवण्यात आला आहे. टीका करणारे नेते आपले वैयक्तिक शत्रूच आहेत असं चंद्रकांत पाटलांसारख्या नेत्यांना वाटतं. चंद्रकांत पाटलांचा राजकारणात उदय नक्की कोणत्या सालात आणि कसा व कुणामुळं झाला हा संशोधनाचा विषय असल्याचं सामनातून म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष असल्याचा सार्वत्रिक समज आहे, मात्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आपण अध्यक्ष आहोत की नाहीत या वैचारिक गोंधळात आयुष्य कंठतात, तिथं चंद्रकांतदादांचे काय, असा सवाल देखील सामनातून करण्यात आला आहे.

WhatsAppShare