म्युकरमायकोसीसचे महाराष्ट्रात दोन हजार बाधित रुग्ण : आरोग्यमंत्री

212
मुंबई,दि.१२(पीसीबी) –  देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. कोरोनाबाधितांची विक्रमी वाढ दररोज  होत आहे. अशातच आता म्युकरमायकोसीस या नव्या आजाराने महाराष्ट्रात पाय पसरायला सुरुवात केली आहे. राज्यात दोन  हजार रुग्णांना  म्यूकरमायकोसिसची बाधा झाल्याचे आढळून  आले आहेत तर या आजारामुळे महाराष्ट्रात आठ जणांचा मृत्यू झाला आहे , अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 
म्यूकोरमायकोसिस हा आजार अनेक कोरोना बाधित रुग्णांना होत असल्याचे समोर आले आहे. राज्यात दोन  हजार रुग्णांना  म्यूकरमायकोसिसची बाधा झाल्याचे आढळून  आले आहे व आठ जण मृत्यूमुखी पडले आहेत.  या आजाराबाबत नागरिकांनी सर्तकता बाळगण्याची गरज असून, लवकरच या आजाराचे उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेतुन केले जाणार आहे, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. 
म्यूकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार असून, या आजाराच्या उपचारासाठी १२ ते १४ इंजेक्शन घ्यावी लागतात. हे इंजेक्शनचे महाग असल्यामुळे त्यांचा खर्च हा सानान्य  नागरिकांच्या आवाक्याबाहेर जात आहे. त्यामुळे या आजारावरील उपचार जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली आहे.
कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन दिला जातो. तेव्हा त्या ऑक्सिजनमधील पाणी शुध्द असले पाहिजे. पाणी शुद्ध नसल्यास हा बुरशीजन्य आजार म्हणजेच म्युकरमायकोसिसची लागण होते. त्याचा संसर्ग झाल्यास नाकाभोवती असलेल्या मोकळ्या जागेत बुरशी साठून राहते. अशा व्यक्तींत नाकातून रक्त येणे, चेहरा एका बाजूने दुखणे, मेंदूत संसर्ग झाल्यास तीव्र डोकेदुखी, छातीत दुखणे, डोळ्यांना त्रास होणे, एकच दृश्य दोनदा दिसणे आदी प्रकारची लक्षणे आढळून येतात. कोरोना आजारातून बरे झालेल्यांपैकी काहींना ही लक्षणे दिसल्याने केवळ औषधोपचार करावे लागतात परंतु  बुरशीचा संसर्ग मोठ्या प्रमाणात असल्यास शस्त्रक्रिया करावी लागते. 
भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे अधिक गंभीर परिणाम दिसून येत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशभरातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, वेंटीलेटर,  ऑक्सिजन, रेमडेसीवीर व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच गेल्यावर्षीचा लॅाकडाऊन आणि आता लादण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे सर्वांनाच आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे एकुणच व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड चीड निर्माण होत आहे.
WhatsAppShare