मोशी येथे गस्त घालत असताना एका सराईत गुन्हेगाराला पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल १ लाख १८ हजार रुपयांचा ऐवज पोलीसांनी जप्त केला आहे.

अभिजित उर्फ बंगाली सुभाष रॉय (वय १९, रा. बनकरवस्ती, मोशी) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार रवींद्र तिटकारे आणि पोलीस शिपाई करण विश्वासे हे मोशी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी अभिजित हा अट्टल गुन्हेगार नंबरप्लेट नसलेल्या गाडीवरून फिरत असताना त्यांना अढळला. यामुळे त्याला पोलीसांनी अडवून त्याची चौकशी केली असता त्याच्याकडील दुचाकी चोरीची असल्याने पोलीसांना  समजले. नंतर त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता अभिजित सराईत गुन्हेगार असल्याचे उघड झाले. त्याच्याकडून एकूण दोन दुचाक्या, एक लॅपटॉप आणि एक मोबाईल फोन असा सुमारे १ लाख १८ हजारांचा ऐवज पोलीसांनी हस्तगत केला आहे. त्याच्याकडून एकूण चार  गुन्हे उघडकीस आले आहेत. पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलीस  करत आहेत.