मोशी, पिंपळे गुरव, तळेगाव, थेरगावात घरफोड्या

145

वाकड, दि. २ (पीसीबी) – मोशी, पिंपळे गुरव, तळेगाव दाभाडे आणि थेरगाव येथे घरफोडीच्या चार घटना घडल्या आहेत. या चार घटनांमध्ये चोरट्यांनी दागिने, मोबाईल फोन, घरगुती वस्तू, लॅपटॉप असा एकूण अडीच लाखांचा ऐवज चोरून नेला आहे.

विजय ज्ञानदेव भोंडे (वय 25, रा. तुपेवस्ती, मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादी भोंडे यांचा मित्र 30 ऑक्टोबर रोजी घराचा दरवाजा उघडा ठेऊन पहाटे कामावर निघून गेला. त्यानंतर अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातून मोबाईल फोन आणि सोन्याची चेन असा 40 हजरांचा ऐवज चोरून नेला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

धनंजय दिलीप मायने (वय 35, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी त्यांचे घर बंद करून सातारा येथे गावी गेले असता रविवारी (दि. 31) सकाळी दहा ते रात्री दहा वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे जोडवे, कमरपट्टा, मुलीचे पैंजण आणि रोख रक्कम असा एकूण 23 हजरांचा ऐवज चोरून नेला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

विकास भरत साबळे (वय 29, रा. नाणे, नवीन उकसान,) यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या तळेगाव दाभाडे येथील घरातून अज्ञात चोरट्यांनी टीव्ही संच, एसी, मिक्सर ग्राइंडर, वॉशिंग मशीन, मायक्रोओव्हन संच, ओटीजी मायक्रोओव्हन संच, घरगुती वस्तू असा एकूण एक लाख 42 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार 29 ऑक्टोबर रोजी रात्री सव्वाआठ ते 30 ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वानऊ वाजताच्या कालावधीत तळेगाव-चाकण रोड, तळेगाव दाभाडे येथे घडला तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

निहाल गफार बेग (वय 24, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. त्यांना त्यांच्या कंपनीने दिलेला 45 हजारांचा लॅपटॉप अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून चोरून नेला. हा प्रकार सोमवारी (दि. 1) सकाळी सव्वासात ते आठ वाजताच्या कालावधीत घडला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare