मोशी ग्रामस्थांसह गृहनिर्माण संस्थांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू, चाऱ्याचे ६ ट्रक रवाना  

208

भोसरी, दि. १३ (पीसीबी) –  सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलेल्या महापूरामध्ये हजारो कुटुंबे उद्‌ध्वस्त झाली आहेत. या पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी मोशी ग्रामस्थांसह विविध सोसायट्यांच्या वतीने  जीवनावश्यक वस्तू आणि जनावरांसाठी चारा असलेले ६ ट्रक पूरग्रस्त भागात आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत पाठविण्यात आले.   

मोशी, चिखली ग्रामस्थांसह या परिसरातील अनेक सोसायट्यांतील नागरिकांनी एकत्र येत ही मदत पाठविली आहे. याचा आदर्श घेत सध्या विविध सोसायट्यांच्या माध्यमातूनही मदतीचा मोठा ओघ सुरुच आहे. शनिवारी (दि. १०) कोल्हापूर, सांगलीकडे दोन ट्रक किराणा माल, दोन टेंपोमध्ये कपडे, औषधे, दोन टेंपोमधून जनावरांसाठी कटबाकुट्टी व चारा पाठवण्यात आला आहे.  या कामासाठी प्रामुख्याने येथील नगरसवेक वसंत बोराटे, माजी नगरसेवक बबनराव बोराटे, शिवसेना विभागप्रमुख योगेश बोराटे यांचे मोठे सहकार्य लाभले.

पूरग्रस्तांना मदत करणे हे आपले सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. अशी भूमिका घेत  नगरसेवक वसंत बोराटे यांनी ही मदत जमा करुन आमदार महशे लांडगे यांच्या माध्यमातून ती वारणा खोऱ्यातील नवे पारगाव येथील स्थलांतरीत पूरग्रस्तांपर्यंत स्वतः पोहचविण्याची जबाबदारी पार पाडली.