‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये’ राहणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाने डोक्यात फावडा घालून महिलेची हत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि.३०) रात्री साडेआठच्या सुमारास मोशीतील, नागेश्वर कॉलनी येथे घडली. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून आरोपी फरार झाला आहे.  

शारदाबाई काकडे (वय ५०, रा. नागेश्वर कॉलनी, मोशी) असे हत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक महेशभाई रामजी पटेल (वय ५५) याच्याविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे भोपाळचे रहिवाशी असून महेश हा बांधकाम व्यावसायिक आहे. तर, शारदाबाई ही गृहिणी असून त्या गेल्या १५ वर्षांपासून महेश याच्यासोबत मोशी येथे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये  राहत होत्या.

दरम्यान, महेश हा शारदाबाईला चारित्र्याच्या संशयावरून सतत त्रास देत होता. शुक्रवारी रात्री महेश दारू पिऊन घरी आला असता त्याने शारदाबाईंशी वाद घालण्यास सुरूवात केली.  त्यानंतर रागाच्या भरात महेशने शारदाबाईच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर फावड्याचे घाव  घालून खून केला. शुक्रवारपासून घरात कोणीही नसल्याने शेजाऱ्यांना संशय आल्याने  त्यांनी भोसरी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर आज (शनिवारी) सकाळी शारदाबाईची हत्या झाल्याचे उघडकीस आले.