मोशीत मित्रांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून तरुणाचा झाला खून

287

मोशी, दि. १३ (पीसीबी) – मित्रासोबत झालेल्या किरकोळ वादातून एका मित्राने दुसऱ्याच्या डोक्यात दगड मारला. यामुळे डोक्यामध्ये अंतर्गत रक्तस्त्राव होऊन झोपेतच त्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवार (दि.११) रात्री दहाच्या सुमारास मोशीतील आदर्शनगरमध्ये घडली.

मुफस्सिर उर्फ आझीम जकिउद्दीन काझी (वय २८, रा. आदर्शनगर, मोशी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सचिन गौतम भोसले (वय ३८, रा. आदर्शनगर, समर्थ कॉलनी, मोशी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संदिप अशोक गौंड (वय २५, रा. आदर्शनगर, मोशी) याच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मुफस्सिर, फिर्यादी सचिन आणि आरोपी संदिप हे तिघेही मित्र आहेत. सोमवारी (दि.१०) संदीप आणि मुफस्सिरमध्ये किरकोळ कारणावरुन भांडण झाले होते. मात्र हा वाद सचिन आणि इतरांनी मिटवला. त्यानंतर मंगळवारी (दि.११) रात्री दहाच्या सुमारास आदर्शनगर येथील धमेंद्र चव्हाण यांच्या घरासमोर मुफस्सिर आणि संदिप यांच्या पुन्हा त्याच कारणावरुन भांडण झाले. यादरम्यान संदिपने मुफस्सिरच्या डोक्यात दगड मारला. त्यानंतर मुफस्सिर घरी जाऊन झोपला. मात्र दुसऱ्या दिवशीची दुपार झाली तरी मुफस्सिर झोपेतून उठला नाही. त्याचा झोपेतच मृत्यू झाला. त्याला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषीत केले. याप्रकरणी आरोपी मित्र संदिप याला पोलिसांनी अटक केली आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.